अर्जुन कर्पे
लाेकमत न्यूज नेटवर्क
कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्याच्या राजकीय क्षितिजावर राजवर्धन अजितराव घोरपडे यांच्या नावाचे पर्व उदयास येत आहे. याची प्रचिती ४ सप्टेंबरच्या राजवर्धन घोरपडे यांच्या वाढदिनी आली. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, औद्याेगिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत संपर्काचे नेटवर्क जाम केले. त्यामुळे राजवर्धन घोरपडे यांच्या क्रेझने ‘राजे.. तुम्ही नेटवर्क जाम केलंया...’ अशी चर्चा तालुक्यात तसेच सोशल मीडियात जाम रंगली आहे.
माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचे पुत्र राजवर्धन घोरपडे यांचा शनिवारी वाढदिवस होता. परंतु कोरोनाची पार्श्वभूमी आणि कौटुंबिक अडचण यामुळे राजवर्धन घोरपडे यांनी आपला वाढदिवस साजरा केला नाही. पण अजितराव घोरपडे यांचे कट्टर कार्यकर्ते व राजवर्धन घोरपडे यांचे तरुण कार्यकर्ते कवठेमहांकाळ विकास सोसायटी अध्यक्ष दिलीपराव झुरे-देशमुख, नगरसेवक सुनील माळी, डोंगरवाडीचे सरपंच दीपकराव शिंदे, तुकाराम पाटील, चोरोचीचे सरपंच रावसाहेब पाटील, वैभव नरुटे, सनी पडळकर, विशाल गिड्डे, सुभाष सूर्यवंशी, सुरेश सूर्यवंशी, नागजचे माजी उपसरपंच तानाजी शिंदे, सराटीचे विजयराव पवार, कोंगनोळीच्या सरपंच नीता जाधव, उपसरपंच प्रमोद मेनगुदले, नरसिंहगावचे उपसरपंच अरुण भोसले, आनंदराव पाटील, दिगंबर पाटील, अजित यमगर या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर राजवर्धन घोरपडे यांचा वाढदिवस शुभेच्छा देत जोरदार साजरा केला.
सिनेअभिनेते रितेश देशमुख, कर्नाटकचे मंत्री लक्ष्मण सवदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मंत्री अमित देशमुख, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार जयकुमार रावले, शिवसेना संपर्क प्रमुख नितीन बानूगडे-पाटील, विक्रमसिंह पाटणकर या राज्यातील बड्या नेतेमंडळींनी राजवर्धन यांचे अभीष्टचिंतन केले. तर जिल्हा तसेच तालुक्यातील काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, युवा नेते शंतनु सगरे, माजी सभापती दत्ताजीराव पाटील, काँग्रेसचे माणिकराव भोसले आदी नेत्यांनी घोरपडे यांना शुभेच्छा दिल्या.
वाढदिवसाच्या निमित्ताने राजवर्धन घोरपडे यांनी राजकीय ‘एंट्री’च्या आधीच आपली छाप तरुण कार्यकर्ते, नेते, जनता यांच्यावर पाडली आहे. ‘मी जनतेसमोर काम घेऊन येईन.’ असे सांगत तरुणांना रोजगार, महिलांसाठी गृहउद्योग आणि तालुक्यातील जनतेला भक्कम सामाजिक, राजकीय आधार देण्याचा मानसच राजवर्धन यांनी वाढदिनी केला. राजवर्धन घोरपडे नावाचा युवा नेता ‘तासगाव कवठेमहांकाळ’च्या राजकीय पटलावर नवे पर्व सुरू करणार हे आता निश्चित मानले जात आहे.