लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्याच्या जीएसटी महसुलात साखराळे येथील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना समुहाने पुन्हा एकदा प्रथम क्रमांक प्राप्त केला असून, केंद्रीय जीएसटीच्या सांगली विभागातर्फे सहाय्यक आयुक्त किशोर गोहिल यांच्या हस्ते याबद्दल समुहाच्या अधिकाऱ्यांना गौरवपत्र देण्यात आले.
कारखान्याचे चीफ अकाऊंटंट अमोल पाटील, डेप्युटी अकाऊंटंट संतोष खटावकर यांना गौरव पत्र देण्यात आले. यावेळी परिक्षेत्र तीनचे सहाय्यक आयुक्त मोहन वाघ, सेवानिवृत्त अधीक्षक शीतल सम्बर्गीकर उपस्थित होते.
यावेळी गोहिल म्हणाले की, जिल्ह्यातील २५ हजार करदात्यांमध्ये गेली तीन वर्षे सातत्याने राजारामबापू समूह प्रथम क्रमांकावर आहे. जिल्ह्याच्या जीएसटी महसुलात साखर उद्योगाचे महत्वपूर्ण योगदान आहे. त्याचबरोबर कास्टिंग, फौंड्री उद्योग, प्लास्टिक उद्योग, इतर अन्न प्रक्रिया उद्योग यांचेही योगदान मोठे आहे.
वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मेढेकर म्हणाले की, सर्वाधिक कर भरणाऱ्यांचा सत्कार दरवर्षी जीएसटी दिनी म्हणजे १ जुलैला केला जातो. मात्र, यावर्षी कोरोनामुळे एकत्रित कार्यक्रम न घेता वेगवेगळ्या वेळी अशा करदात्यांचे सन्मान करण्यात येत आहेत.
यावेळी सर्वाधिक करभरणा करणारे उदगिरी साखर कारखाना, पारे, तासगाव येथील सतीश ट्रेडिंग कंपनी, तसेच कुपवाड येथील युएसके ॲग्रो सायन्स यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास केंद्रीय जीएसटी अधीक्षक रवींद्र कुलकर्णी, सिद्धार्थ गुप्ता, निरीक्षक प्रमोद कुशवाह, महेंद्र सिंग, पंकज बंसल, अविनाश गुप्ता, प्रदीप पाटील, भरत घार्गे, राजारामबापू कारखान्याचे विजय कोळी, उदगिरी कारखान्याचे विक्रमसिंह माने आदी उपस्थित होते. अधीक्षक जयंत वाटवे यांनी आभार मानले.