सांगली : मार्केट यार्डातील एक बेदाणा व्यापारी कोटीहून अधिक रकमेचा बेदाणा खरेदी करून सध्या ‘नाॅट रिचेबल’ झाला आहे. त्यामुळे आठ ते दहा व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. काहींनी बाजार समिती प्रशासनाशी संपर्क साधून हा प्रकार कानावर घातला आहे.
सांगली मार्केट यार्डातील एका व्यापाऱ्याचा हळद, गूळ, बेदाण्याचा मोठा व्यापार आहे. या व्यापाऱ्याने काही दिवसांपूर्वी हळद, गूळ व बेदाणा मोठ्या प्रमाणात खरेदी केला. व्यापाऱ्याने हळद व गूळ व्यापाऱ्यांचे पेमेंट दिले आहे. परंतु, आर्थिक अडचणीमुळे बेदाणा व्यापाऱ्यांचे पैसे दिले नाहीत. आठ ते दहा व्यापाऱ्यांचे जवळपास एक कोटी रुपये अडकलेत. व्यापाऱ्यांनी त्याच्याकडे विचारणा केल्यानंतर सुरुवातीला चालढकल केली. परंतु, सध्या व्यापारी नाॅट रिचेबल झाला आहे. त्याचे वडील संपर्कात आहेत. त्यांनी पैसे अडकलेल्या व्यापाऱ्यांना दिलासा दिला आहे. परंतु व्यापाऱ्यांचे तेवढ्यावर समाधान झाले नसून, पैसे वसुलीसाठी त्यांनी हेलपाटे सुरू केलेत.
याबाबत काही व्यापाऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाकडे तक्रार केली आहे. पेमेंटबाबत बैठक झाली असून, त्यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. व्यापाऱ्यांचा शोध सुरू असून, अद्यापही त्याचा ठावठिकाणा समजला नाही. बेदाणा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र कुंभार यांना विचारले असता त्यांनी अद्याप तक्रार आली नसल्याचे सांगितले. दरवर्षी दिवाळीपूर्वी शून्य पेमेंटची प्रक्रिया राबविली जाते. यावर्षीही त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.