मिरज रेल्वे सुरक्षा दलाकडे मिरज ते भवानीनगरपर्यंतच्या रेल्वेमार्ग व रेल्वेस्थानकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे. कार्यक्षेत्र मोठे असल्याने घटनास्थळी तात्काळ पोहोचण्यास अडचणी येतात. यामुळे रेल्वे सुरक्षा दलाने किर्लोस्करवाडी येथे आउटपोस्ट उभारण्याची परवानगी मागितली होती. त्याला मंजुरी मिळाली आहे. मिरज रेल्वे सुरक्षा दलाच्या अंतर्गत किर्लोस्करवाडीतील आउटपोस्ट काम करणार आहे. येथे एक उपनिरीक्षक, एक सहायक उपनिरीक्षक आणि आठ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
किर्लोस्करवाडीत रेल्वेस्थानकात जुन्या इमारतीतील स्थानक अधीक्षकांचे कार्यालय नव्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे जुन्या इमारतीची रंगरंगोटी करून तेथे आरपीएफ आउटपोस्ट सुरू करण्यात येणार आहे. ताकारी ते जेजुरी स्थानकादरम्यान लांब पल्ल्यांच्या एक्स्प्रेसवर दरोड्याच्या घटना घडल्या आहेत. मिरज ते भवानीनगरदरम्यान रेल्वेगाड्यात चोरट्यांचा उपद्रव सुरू आहे. अशा घटना घडल्यानंतर मिरज सुरक्षा दलाला मिरजेतून तेथे पोहोचण्यासाठी दोन तासांचा अवधी लागतो. चोरी व अन्य घटना घडल्यानंतर तात्काळ घटनास्थळी पोहोचता यावे, यासाठी किर्लोस्करवाडीत आउटपोस्ट सुरू होत असून, पुणे रेल्वे सुरक्षा दलाचे आयुक्त त्याचे उद्घाटन करणार असल्याचे सांगण्यात आले.