सांगली : कुपवाड येथे सुरू असलेला तीनपानी जुगार अड्डा स्थानिक गुन्हे अन्वेेषण शाखेच्या पथकाने उद्ध्वस्त केला. यात सहा जणांवर कारवाई करतानाच एक लाख १० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यात जुगार अड्डामालक एैनुद्दीन अल्लाबक्ष मुजावर (वय ५१, रा. इस्लाम मशिदीजवळ, कुपवाड) याच्यासह सिकंदर दस्तगीर जमादार (रा. तराळगल्ली, कुपवाड), तैय्यब गफूर जमादार (रा. नूर इस्लाम मशिदीजवळ, कुपवाड), गौस फरदीन मुजावर (दर्गाजवळ, कुपवाड), आदम ईलाही समलेवाले (रा. सावळी) आणि राजू इकबाल मुजावर (शांत कॉलनी, कुपवाड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे उपनिरीक्षक अभिजित सावंत यांना माहिती मिळाली होती की, कुपवाड येथील इस्लाम मशिदीजवळ एका खोलीत जुगार अड्डा सुरू आहे. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने छापा टाकला असता, सहा जण तीनपानी पत्त्याचा जुगार खेळत असल्याचे दिसून आले. त्यांच्याकडून रोख १० हजार ८०० रुपयांसह पाच मोबाइल असा एक लाख १० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पंचनाम्यानंतर गुन्हा कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभिजित सावंत, सुभाष सूर्यवंशी, जितेंद्र जाधव, राहुल जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.