तासगाव : अत्यंत लक्षवेधी ठरलेल्या तासगाव — कवठेमहांकाळ मतदारसंघात माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी भाजपचे अजितराव घोरपडे यांचा दारुण पराभव करीत, मतदारसंघावरची पकड मजबूत केली आहे. आर. आर. यांना १ लाख ८ हजार ३१0 मते मिळाली, तर घोरपडे यांना ८५ हजार ९00 मते मिळाली. तब्बल २२ हजार ४१0 मतांनी आर. आर. पाटील यांचा विजय झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गावा-गावात दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच दिवाळी साजरी केली.निवडणुकीत काँग्रेस, शिवसेनेने उमेदवार दिले असले तरी, त्यांना मिळालेली मते नगण्यच आहेत. चौरंगी सामना पक्षीय पातळीवर असला तरी, लढत दुरंगीच ठरली. दि. १५ रोजी मतदान झाल्यापासून ते आज सकाळी मतमोजणी सुरू होईपर्यंत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत प्रचंड धाकधुक होती. अंदाज, तर्क—वितर्क लढवले जातच होते.प्रत्यक्षात मतमोजणीस सुरुवात झाली, तेव्हा पहिल्या फेरीत अजितराव घोरपडे यांना ७९२ मताधिक्य मिळाले. त्यानंतर मात्र भाजपात आनंद, तर राष्ट्रवादीत तणाव वाढला होता. साधारणत: ही पहिल्या फेरीतील गावे पश्चिम भागातील होती. त्यानंतरच्या फेऱ्यांमध्ये आर. आर. पाटील यांना मताधिक्य मिळत गेले. प्रत्येक फेरीत वाढत असणाऱ्या मताधिक्यामुळे त्यांचे एकूण मताधिक्य वाढत गेले.जसजसे मतमोजणी सभागृहातून मताधिक्याचे आकडे बाहेर पडतील, तसा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू होता. केवळ तासगाव, कवठेमहांकाळमध्येच नाही, तर ग्रामीण भागातही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आतषबाजी करून जल्लोष केला. रस्त्यावर अक्षरश: गुलालाचा थर साठून राहिला होता. मतमोजणीवेळी पहिल्या ११ फेरीत आर. आर. पाटील यांना ११ हजार ५८८ मताधिक्य होते. साधारणत: मतदारांचा कौल लक्षात आल्यानंतर आबांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले होते. तरीही कवठेमहांकाळ तालुक्यातील गावांची मतमोजणी होणे बाकी होते. त्यामुळे पुन्हा उत्कंठा लागून राहिली होती. कवठेमहांकाळ तालुक्यातूनही आबांना मताधिक्य मिळत असल्याचा अंदाज पुढील दोन फेऱ्यांमध्येच स्पष्ट झाला होता. २0 व्या फेरीत अजितराव घोरपडे यांना १ हजार ९८५ मतांचे अधिक्य मिळाले. २१ व्या फेरीमध्ये ३ फेऱ्या सोडल्या, तर सर्व फेऱ्यांमध्ये आबाच आघाडीवर राहिले. पोस्टाच्या मतातही त्यांना ३९७ चे मताधिक्य मिळाले. मतमोजणीच्या अखेरच्या टप्प्यात आर. आर. यांनी मतमोजणी सभागृह गाठले. (वार्ताहर)कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळेच माझा विजयराष्ट्रवादीच्या कायकर्त्यांनी चांगली झुंज दिली. माझ्या विजयाचे श्रेय कार्यकर्ते व प्रेम करणाऱ्या जनतेचे आहे. माझ्या अडचणीच्याप्रसंगी सामान्य जनता पाठीशी उभा राहिली हे यावेळी दिसून आले आहे. भाजपने तासगावात दिग्गजांच्या सभा घेतल्या. त्यातूनच त्यांचा आत्मविश्वास वाढलेला होता. परंतु मतदारांनी त्यांना झिडकारले आहे. राज्याच्या हितासाठी स्थिर सरकार आले पाहिजे. स्थिर शासनालाच महत्त्व आहे. अस्थिरता माजली तर विकास कामावर परिणाम होतो. - आर. आर. पाटील, राष्ट्रवादीचे उमेदवारकाँग्रेसची आबांना मदततासगाव, कवठेमहांकाळ या दोन्ही तालुक्यांचे मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न घेऊन मी जनतेच्या दरबारात गेलो होतो. या प्रश्नांना काँग्रेसच न्याय देऊ शकते. आता जनतेने जो कौल दिला आहे, तो मला मान्य आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार आर. आर. पाटील यांना साथ दिली. त्यामुळेच माझा पराभव झाला. आता तालुक्यातील काँग्रेस बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार.- सुरेश शेंडगे, उमेदवार, काँग्रेसमतदारांचा कौल मान्यतासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील मतदारांनी दिलेला कौल मान्य आहे. मतदारापर्यंत माझी भूमिका पोहोचवली होती. परंतु, मतदारांचा घोडेबाजार करून मते मिळवण्यात विरोधक यशस्वी झाले. शेवटी लोकशाहीत मतदारांनी कसाही कौल दिला असला तरी तो मान्य केलाच पाहिजे. तरीही भविष्यातही मतदारसंघातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल.-अजितराव घोरपडे, भाजप उमेदवारदोन्ही तालुक्यांचे मताधिक्यतासगाव तालुक्यातील ४८ गावांतून आर. आर. यांना १६ हजार १८८ इतके मताधिक्य मिळाले, तर कवठेमहांकाळ तालुक्यातील ६० गावांतून ६ हजार २२२ चे मताधिक्य मिळाले.या मैदानात काँग्रेसचे सुरेश शेंडगे व शिवसेनेचे महेश खराडे यांना मिळालेल्या मतावरून या दोन्ही पक्षांना मतदारांनी स्पर्धेत ठेवले नाही..
आर. आर. पाटील यांनी तासगावचा गड राखला
By admin | Updated: October 20, 2014 00:40 IST