लोकमत न्यूज नेटवर्क
वारणावती : गव्यांच्या कळपाने चांदोली अभयारण्य परिसरातील दहा किलोमीटरवरील शेतातील पिके उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. एकीकडे गवे पिकांचे नुकसान करत आहेत; तर दुसरीकडे बिबटे शेळ्या-मेंढ्या फस्त करीत आहेत. यामुळे उदरनिर्वाह करायचा कसा, असा प्रश्न ग्रामस्थांपुढे निर्माण झाला आहे. तातडीने अभयारण्याभोवताली कुंपण घालणे गरजेचे आहे. अन्यथा परिसरातील शेतकरी उद्ध्वस्त होईल. मानव व जंगली प्राण्यांचा संघर्ष निर्माण होईल.
वानरांचा कळप शिवारातील पिकांचे नुकसान करतात. माणसाच्या अंगावर धावून जातात. एकटा माणूस किंवा महिला शेतात जाण्यास घाबरत आहेत. पिकांचे होणारे नुकसान पाहून शेतकरी हतबल होत आहे. तर दुसरीकडे बिबटे, तरस शेळ्या-मेंढ्यांवर हल्ले करीत आहेत.
गव्यांच्या कळपाने उभी पिके उद्ध्वस्त होतात. यामुळे डोंगरकपारीतील शेती पिकाविना ओस पडली आहे. तर बिबट्यांच्या दहशतीमुळे काही शेतकऱ्यांनी जनावरे पाळणे बंद केले आहे. शासनाने याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. अभयारण्याला कुंपण घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
कोट
डोंगरकपारीतील शेतकऱ्यांची तटपुंजी शेती आहे. उदरनिर्वाहाचे साधन नाही. चांदोली अभयारण्यातील हिंस्र प्राण्यांची दहशत व वानरे, मोर, गवे यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर पिकांचे होणारे नुकसान यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होत आहे. याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा. अन्यथा संघर्ष करावा लागेल.
- बाळासाहेब नायकवडी,
उपसभापती, शिराळा
१) फोटो-१९वारणावती१
फोटो ओळ : चांदोली अभयारण्याला कुंपण नसल्याने वन्यप्राण्यांकडून पिके उद्ध्वस्त केली जात आहेत.