तासगाव : पुणदी (ता. तासगाव) येथे चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा खून केल्याची घटना घडली. प्रतिभा प्रवीण सुतार (वय २८) असे विवाहितेचे नाव असून, याप्रकरणी पतीसह दिराला अटक केली आहे. २२ जून रोजी सकाळी सहाच्या पूर्वी हा प्रकार घडला, मात्र आज (दि. २४) तो उघडकीस आला. तोंडावर उशी दाबल्यामुळे श्वास गुदमरल्याने प्रतिभा यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट होत असल्याचे तासगाव पोलिसांनी सांगितले. पती प्रवीण शंकर सुतार (३५) व दीर सुनील शंकर सुतार (३०) यांना अटक केली आहे.मृत प्रतिभा यांचे बंधू अरविंद सुतार (रा. खंडेराजुरी, ता. मिरज) यांनी सोमवारी (दि. २३) रात्री उशिरा याबाबतची फिर्याद दिली. प्रतिभा आणि प्रवीण यांचा विवाह सात वर्षांपूर्वी झाला होता. विवाहानंतर प्रवीण कोणत्या ना कोणत्या कारणावरून प्रतिभा यांना शिवीगाळ, मारहाण करत होता. प्रतिभा यांना तीन मुली आहेत. त्यांना दोन जाऊ असून, त्यांनाही मुलीच आहेत. प्रतिभा यांना मुलगा होत नाही, म्हणूनही पती मारहाण करत असे, असे प्रतिभाने भाऊ अरविंद यांना दूरध्वनीवरून सांगितले होते. त्याशिवाय गेल्या तीन-चार महिन्यांपासून प्रवीण व सुनील सुतार हे प्रतिभा यांना चारित्र्याच्या संशयावरून मारहाण करत होते. प्रतिभा यांनी माहेरी जावे, यासाठीही तगादा लावला होता.शनिवारी (दि. २१) सकाळी सहाच्या दरम्यान प्रवीणने अरविंद सुतार यांना दूरध्वनीवरून प्रतिभा मृत झाल्याचे कळविले. रात्री प्रतिभा यांचे डोके दुखत होते व सकाळी उठवत असताना त्या मृत झाल्याचे कळले, असे प्रवीणने त्यांना सांगितले. त्यावेळी घटनेची नोंद पोलिसांत केल्याशिवाय व शवविच्छेदन झाल्याशिवाय अंत्यसंस्कार करायचे नाहीत, असे अरविंद यांनी बजावले होते. रविवारी (दि. २२) त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यात प्रतिभा यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी, असे म्हटले होते.दरम्यान, पोलिसांनी हा मृत्यू संशयास्पद असल्याने तपास सुरू केला. प्रभारी पोलीस उपअधीक्षक पौर्णिमा चौगुले यांनीही पुणदी येथे भेट दिली. सोमवारी रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. चौकशीत हा प्रकार खून असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुन्हा दाखल केल्याचे तपास अधिकारी उपनिरीक्षक अविनाश निडवेनकेरी यांनी सांगितले. तोंडावर उशी दाबल्यामुळे श्वास गुदमरल्याने प्रतिभा यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. त्यानंतर प्रवीण सुतार आणि सुनील सुतार यांना अटक करण्यात आली. (वार्ताहर)
पुणदीत विवाहितेचा खून
By admin | Updated: June 25, 2014 01:04 IST