कोरोनामुळे मार्च २०२० आणि जानेवारी २०२१ पर्यंत जिल्हा परिषद, माध्यमिक शाळा बंदच होत्या. पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सध्या सुरू झाल्या आहेत. यामुळे पोषण आहार घरपोच पालकांना दिला जात आहे. शाळा सुरू झाल्या असल्या तरी पोषण आहार शाळेत दिला जाणार नाही, असेही शिक्षण विभागाच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले. शहरी भागातील मुलांना पोषण आहारात कडधान्य, डाळी मिळत नाहीत. केवळ तांदूळच दिला जात असल्यामुळे मुलांच्या पालकांमधून नाराजीचा सुर आहे. ग्रामीण भागात कडधान्य, डाळी दिल्या जात असतील तर शहरी मुलांनाच का नाही, अशाही पालकांच्या तक्रारी आहेत.
चौकट
असा मिळतोय आहार
पहिली ते पाचवीच्या मुलांना पाच किलो तांदूळ, मसूर डाळ एक किलो ४०० ग्रॅम, मटकी एक किलो, तर सहावी ते आठवीच्या मुलांना तांदूळ सात किलो ५०० ग्रॅम, मसूर डाळ दोन किलो आणि मटकी एक किलो ५०० ग्रॅम मिळत आहे.
चौकट
जिल्ह्यातील पोषण आहार लाभार्थी : ३३२५००
ग्रामीण लाभार्थी : २७९९४४
शहरी लाभार्थी : ५२५५६
चौकट
कोरोनामुळे घरपोच आहार
कोरोनाच्या संकटामुळे पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना घरपोच शालेय पोषण आहार दिला जात आहे. ग्रामीण दोन लाख ७९ हजार ९४४ मुलांना घरपोच तांदूळ, डाळी, कडधान्य घरपोच मिळत आहे. उर्वरित शहरी भागात केंद्रीय स्वयंपाकगृहांतर्गत समाविष्ट असणाऱ्या शाळांमधील मुलांना केवळ तांदूळच दिला होता. कडधान्य आणि डाळी मिळत नसल्यामुळे शहरी भागातील पालकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
कोट
शासनाच्या आदेशानुसार ग्रामीण भागातील मुलांना तांदूळ, डाळी आणि कडधान्यासह शालेय पोषण आहाराचा पुरवठा होत आहे. यामध्ये कुठेही पालकांच्या तक्रारी नाहीत. शहरी भागामध्ये केंद्रीय स्वयंपाकगृहांतर्गत समाविष्ट असणाऱ्या शाळांना केवळ तांदूळच दिला जात आहे.
- एम. सखर मुल्ला, लेखाधिकारी, शालेय पोषण आहार, जिल्हा परिषद, सांगली.