लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कुपवाड येथील तुळजाई नगरमध्ये महापालिकेच्या सि.स.नं. १४९/१ या खुल्या भूखंडावरील नियोजित महात्मा बसवेश्वर स्मारक, उद्यान व अनुभव मंडपासाठी एक कोटीची तरतूद करू, अशी ग्वाही महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळाला दिली. भाजपचे गटनेते विनायक सिंहासने यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महापौर व आयुक्त नितीन कापडणीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी स्थायी सभापती पांडुरंग कोरे, नगरसेवक राजेंद्र कुंभार, महेश सागरे उपस्थित होते. सिंहासने म्हणाले, महापालिका क्षेत्रात महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक उभारण्याची लिंगायत समाजाची मागणी आहे. यासाठी कुपवाड येथील तुळजाई नगरमधील १४९/१ या खुल्या भूखंडावर भव्य स्मारक, अनुभव मंडप व उद्यान विकसित करावे यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये यासाठी तरतूद करण्याची मागणी महापौर सूर्यवंशी यांच्याकडे केली होती. त्यांनी केवळ २५ लाख रुपयांची तरतूद केली होती. याबाबत समाजाच्या शिष्टमंडळासह त्यांची भेट घेतली. स्मारकासाठी केलेली तरतूद अपुरी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच एक कोटीची तरतूद करावी अशी मागणी केली. महापौरांनीही त्याला सहमती दर्शविली आहे. याशिवाय वास्तुविशारदची नियुक्ती करून आराखडा तयार करण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत, असेही सिंहासने म्हणाले.