लाेकमत न्यूज नेटवर्क
सांगली : लॉकडाऊन काळात बाहेरील जिल्ह्यातून औषधे आणण्यास अडचणी येत असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांचे हाल होत आहेत. त्यामुळे तातडीने जिल्ह्यातच औषधे उपलब्ध करावीत, अशी मागणी फाइट अगेन्स्ट थॅलेसेमिया संघटनेचे अध्यक्ष धनंजय नामजोशी यांनी केली.
शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता सुधीर नणंदकर, बालरोग विभागप्रमुख डॉ. शिशिर मिरगुंडे यांना संघटनेच्या वतीने मंगळवारी निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, जानेवारी महिन्यात संघटनेने केलेल्या पाठपुराव्याने मिरज सिव्हिलमध्ये थॅलेसेमिया रुग्णांसाठी औषधे उपलब्ध झाली होती; पण केवळ महिन्याच्या आतच हा औषधसाठा संपला. त्यातच कडक लॉकडाऊन आणि जिल्ह्याबाहेर जाण्याला बंदीमुळे रुग्णांचे पालक ही औषधे आणण्यासाठी कोल्हापूर किंवा सातारा सिव्हिल येथेही जाऊ शकत नव्हते. संघटनेने सांगली तसेच सातारा जिल्ह्यातील थॅलेसेमिया रुग्णांच्या पालकांना कोल्हापुरातून औषधे घरपोच दिली आहेत. जिल्ह्याबाहेरील रुग्णांना औषधे देऊन कोल्हापुरातील जिल्हा रुग्णालयातील औषध साठा संपत आला आहे. तरी लवकरात लवकर सांगली जिल्ह्यातील थॅलेसेमिया रुग्णांसाठी पुन्हा औषधे उपलब्ध करून द्यावीत व रुग्णांची औषधाविना होत असलेली गैरसोय थांबवावी.
यावेळी अभिजित बुधले, दत्तात्रय कदम, राजू वाघमारे, किशोर कांबळे, सुंदर धोंगडी, सचिन वैरागे, नरेश सचदेव हे थॅलेसेमिया रुग्णांचे पालक उपस्थित होते.
सांगली सिव्हिलमध्ये जिल्हा शल्य चिकित्सकांच्या वतीने डॉ. प्रमोद चौधरी यांनी निवेदन स्वीकारले.