सांगली : डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर बीड, उस्मानाबाद, अहमदनगर आदी जिल्ह्यांतून येणाऱ्या ऊसतोड मजुरांचे हेल्थकार्ड बनविण्याच्या सूचना साखर कारखान्यांचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) यांना दिल्या आहेत. जिल्ह्यातील पाच ठिकाणी ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी करण्यासाठी चेक पोस्टही सुरू केले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी आज दिली.ते म्हणाले की, सध्या डेंग्यूची साथ सर्व ठिकाणी आहे. गॅस्ट्रोचे रूग्णही आढळत आहेत. यामुळे जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांची जिल्हा परिषदेत बैठक घेतली. या बैठकीमध्ये कारखान्याच्या ठिकाणी येणाऱ्या ऊसतोड मजुरांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्यासाठी शौचालये उभारण्याची सूचना दिली आहे. मजुरांच्या राहण्याच्या ठिकाणी स्वच्छता ठेवण्यात यावी, प्रत्येक मजुराच्या रक्ताची तपासणी करावी, या सर्व माहितीचे हेल्थकार्ड कारखान्यांनी ठेवले पाहिजे, अशी सूचनाही प्रत्येक कारखान्याच्या व्यवस्थापकांना दिल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
ऊसतोड मजुरांना हेल्थकार्ड देणार
By admin | Updated: November 22, 2014 00:02 IST