सांगली : ओबीसी समाजाच्या आरक्षण प्रश्नावर राज्य शासनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ सांगलीत भाजप ओबीसी आघाडीच्यावतीने निदर्शने करण्यात आली.
निवेदनात भाजपने म्हटले आहे की, आघाडी सरकारने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण घालवले आहे. ओबीसी आरक्षणासाठी न्यायालयाने मागितलेला इंपेरिकल डेटा अगोदर उपलब्ध करून दिला नाही आणि न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यानंतर ते पूर्ववत करण्यासाठी आयोग गठित करून इंपेरिकल डेटा गोळा करण्यात कुचराई केली. आता पुन्हा न्यायालयाने आरक्षणामुळे निवडणुका पुढे ढकलता येणार नसल्याचा निकाल दिल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुका आरक्षणाविना पार पडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, ओबीसी शहर जिल्हाध्यक्ष अमर पडळकर, नीता केळकर, स्वाती शिंदे, संगीता खोत, गटनेते विनायक सिंहासने, नगरसेविका कल्पना कोळेकर, उर्मिला बेलवलकर आदी उपस्थित होते.