सदानंद औंधे- मिरज सांगली-मिरज शहरांचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाल्याने नगर भूमापन विभागाने दोन्ही शहरांच्या हद्दवाढीचा प्रस्ताव मागविला आहे. मात्र सिटी सर्व्हेत समावेशासाठी ठराव व आवश्यक निधीची तरतूद करण्यासाठी महापालिकेची तयारी नसल्याने हद्दवाढीचे काम रखडले आहे. महापालिकेने हद्दवाढीचा ठराव केल्यास सांगली, मिरजेतील विस्तारित भागातील मिळकतींचे मोजमाप करण्यात येणार असल्याचे भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक विष्णू शिंदे यांनी सांगितले.गेल्या दहा वर्षांत सांगली-मिरज शहरांचा चौफेर विस्तार झाला आहे. नगरपालिका असताना सांगलीत दोनवेळा व मिरजेत एकदा गावठाण हद्दवाढ करण्यात आली आहे. मात्र महापालिकेच्या निर्मितीनंतर गावठाणात शहराचा केवळ चाळीस टक्के भागच राहिला असल्याने दोन्ही शहरांचा गावठाण हद्दवाढीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. गावठाण हद्दवाढीमुळे सांगली-मिरजेतील उपनगरातील मिळकतधारकांना सात-बाराऐवजी सिटी सर्व्हे उताऱ्यासह नकाशे, रेकॉर्ड नोंदी, प्रत्येक मिळकतीचा स्वतंत्र उतारा मिळण्याची सोय होणार आहे. गावठाण हद्दवाढीमुळे महापालिकेस नागरी सुविधांच्या समायोजनासह मिळकतधारकांना चटई क्षेत्रात वाढ मिळणार आहे. महापालिकेची स्थापना झाल्यानंतर सांगली, मिरज शहराच्या विस्तारित भागात वसाहती मोठ्याप्रमाणात वाढल्या आहेत. मात्र गेल्या वीस वर्षांत दोन्ही शहरात गावठाण हद्दवाढ झालेली नाही. गावठाण हद्दवाढीसाठी सर्वेक्षण व नोंदी तयार करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च होणार आहे. महापालिकेने हद्दवाढीस संमतीचा ठराव करून हा खर्च भूमी अभिलेख विभागास देण्याची तयारी दर्शविल्यास गावठाण हद्दवाढीचे काम सुरू होणार आहे. मात्र महापालिकेने तयारी दर्शविली नसल्याने गावठाण हद्दवाढीचे काम रखडले आहे. हद्दवाढीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठविण्यात आला असून, महापालिका ठरावासह आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यास हद्दवाढ होणार असल्याचे सांगण्यात आले. सध्या सांगली, मिरजेतील गावठाण हद्दीतील मिळकतधारकांच्या नोंदी संगणकीकृत करण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण होताच मिळकतीचा संगणकावरील उतारा मिळणार आहे. सातशे गावे : नगर भूमापनचा उतारा १७६ गावातचजिल्ह्यात ७०४ गावे असून, त्यापैकी केवळ २५ टक्के गावातच नगर भूमापनचा मिळकतीचा उतारा मिळण्याची सोय आहे. उर्वरित गावात ग्रामपंचायतींचा उतारा देण्यात येतो. जिल्ह्यातील दहा तालुक्यांतील दोन हजार लोकसंख्येच्या दहा गावांचा सिटी सर्व्हेमध्ये समावेश करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींचा ठराव घेण्यात आला आहे. इलेक्ट्रिक टोटल स्टेशन यंत्राच्या साहाय्याने गावांच्या हद्दीची व मिळकतीची मोजणी करण्यात येणार आहे. या दहा गावांचे सिटी सर्व्हे रेकॉर्ड तयार होणार असून, मिळकतधारकांना संगणकीकृत दाखला मिळणार आहे. मिळकतीची किंवा शेतजमिनीच्या मोजणीसाठी आॅनलाईन यंत्रणा उपलब्ध आहे. मोजणीसाठी आॅनलाईन अर्ज केल्यानंतर मिळकतधारकास मोजणी होण्याची तारीख व मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव व मोबाईल क्रमांक मिळण्याची सोय आहे.
सांगली-मिरज शहरांच्या हद्दवाढीचा प्रस्ताव
By admin | Updated: December 17, 2015 22:51 IST