सांगली : महापालिकेच्या प्रभाग समिती दोनमधील विविध ११ विकासकामांची २५ लाखांची निविदा प्रसिद्ध केली होती; पण निविदा संकेतस्थळावर दिसत नव्हती. शिवाय यात मिरजेतील इमारत रंगकामही घुसडण्यात आले होते. याबाबत नागरिक जागृती मंचने लेखी तक्रार केली होती. अखेर ही निविदा प्रक्रिया रद्द करून फेर निविदा काढण्याची शिफारस सिस्टम मॅनेजर नकुल जकाते यांनी सोमवारी सहायक आयुक्तांकडे केली.
प्रभाग समिती दोनअंतर्गत २५ लाख रुपये खर्चाच्या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. निविदा भरण्याची अंतिम तारीख १८ सप्टेंबर आहे. यात हरित क्षेत्र विकसित करण्यासाठी लाल गाळ माती पुरविणे, प्रभाग समिती कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर शेड मारणे, आमराई उद्यानात रंगकाम, विविध उद्यानांत ग्रीड टाकणे, उद्यानातील ठिबक सिंचन प्रणाली दुरुस्त करणे आदी कामांचा समावेश आहे. या निविदेत प्रभागाबाहेरील म्हणजेच मिरजेच्या इमारतीचे रंगकाम करण्याचे कामही घुसडण्यात आले होते. निविदेमध्ये मोठ्या प्रमाणात गोलमाल झाल्याचा आरोप नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी केला होता.
निविदा प्रक्रियेवरच संशयाचे ढग निर्माण झाल्याने सिस्टम मॅनेजर नकुल जकाते यांनी ही निविदा प्रक्रिया रद्द करून नवीन प्रक्रिया राबविण्याबाबत सहायक आयुक्तांना पत्रव्यवहार केला. त्यानंतर ही निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.