युनूस शेख : इस्लामपूर :: इस्लामपूर येथे पशुवैद्यकीय रुग्णालयाची नवीन इमारत म्हणजे ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाली आहे. जनावरांवर शस्त्रक्रिया करण्याची सुविधा जिल्ह्यात फक्त मिरज येथे उपलब्ध आहे. त्यापाठोपाठ ही सुविधा इस्लामपूरमधील रुग्णालयात सुरू होणार आहे. मात्र इमारतीचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. इमारतीचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आतापर्यंत तीन लाखांचा दंड करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.पशुवैद्यकीय रुग्णालयाची ही इमारत १ कोटी २० लाख रुपयांच्या प्रस्तावित खर्चाची आहे. आतापर्यंत फक्त इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यातील विजेची व्यवस्था अद्याप कार्यान्वित झालेली नाही. रंगरंगोटी करून उभा असलेली ही इमारत केवळ शोभेची वास्तू बनली आहे. वापराविना या इमारतीत मद्यपींचा अड्डा बनला असून प्रेमीयुगुलांचे येथे बिनधास्त चाळे सुरू असतात. आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी त्यासंदर्भात निवेदन दिल्यानंतर तेथे सुरक्षारक्षक ठेवण्यात आला आहे.जनावरांवरील शस्त्रक्रिया, त्यांचे एक्स-रे काढणे अशी सुविधा सध्या जिल्ह्यात फक्त मिरज येथे उपलब्ध आहे. तेथे उमदीपासून ते कोकरूडपर्यंत आणि आटपाडीपासून हातकणंगले तालुक्याच्या हद्दीपर्यंतची जनावरे घेऊन शेतकऱ्यांना जावे लागते. या सर्व खटाटोपात शेतकऱ्याला मानसिक त्रास व प्रचंड मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असतो. त्यामुळे अशाच प्रकारची सुविधा इस्लामपुरात सुरू झाल्यावर किमान वाळवा, शिराळा, पलूस, कडेगाव या चार लगतच्या तालुक्यातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. येथील एक्स-रे मशीनची यंत्रणा, इमारत आणि इतर सुविधांअभावी गेल्या किमान ७-८ वर्षांपासून धूळ खात पडून आहे. इस्लामपूर शहरातील पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या इमारतीचे काम पूर्ण झाल्यास तेथे अद्ययावत सुविधांद्वारे जनावरांवर उपचार करता येणार आहेत. मात्र इमारतीमधील विजेची व्यवस्था अपूर्ण असल्याने तेथे रुग्णालय स्थलांतरित करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. पशुवैद्यकीय विभागाच्या वरिष्ठांनी यामध्ये गांभीर्याने लक्ष घालून जनावरांसाठी सर्व सुविधा व उपचार करण्याची व्यवस्था तातडीने सुरू करावी, अशी पशुधन चालक शेतकऱ्यांची मागणी आहे.
पशुवैद्यकीय रुग्णालय असून अडचण...
By admin | Updated: March 30, 2015 00:15 IST