इस्लामपूर : नेर्ले (ता. वाळवा) येथील प्रेयसीचा डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या कापूसखेडच्या प्रियकरास येथील न्यायालयाने १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. खुनाची ही घटना २ एप्रिल रोजी घडली होती. तब्बल आठ दिवसांनी बहे हद्दीतील पेठ ओढ्यातील पाण्यात सडलेल्या अवस्थेत या प्रेयसीचा मृतदेह मिळाल्यानंतर खुनाच्या घटनेला वाचा फुटली.
अशोक पांडुरंग डेळेकर (४६, रा. कापूसखेड) असे अटकेत असलेल्या संशयिताचे, तर मंगल पांडुरंग गुरव (४६, रा. नेर्ले) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दोघांमध्ये अनैतिक संबंध होते. २ एप्रिलच्या रात्री मंगलने अशोक डेळेकर याच्याकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर झालेल्या वादातून डेळेकर याने मंगलच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर दगड घालून तिचा खून केला.
पोलिसांनी डेळेकर याला येथील न्यायालयासमोर उभे केले. सरकारी वकिलांनी या गुन्ह्यात वापरलेली दुचाकी तसेच गुुन्ह्यावेळी डेळेकर याच्या अंगावर असणारे कपडे हस्तगत करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती ग्राह्य मानत डेळेकर याला चार दिवसांची पोलीस कोठडी दिली. सहायक पोलीस निरीक्षक अनिल जाधव अधिक तपास करीत आहेत.