कासेगाव : वाळवा-शिराळा तालुक्यात खासगी सावकारी जोमात चालू असतानाही पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. कोरोनाच्या संकटात खासगी सावकार सर्वसामान्यांची आर्थिक पिळवणूक करत असल्याचे दिसून येत आहे. तरीही पोलीस या सावकारांच्या मुसक्या आवळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. व्याजाच्या माध्यमातून तिप्पट, चौपट रक्कम कर्जदाराकडून वसूल केली जात आहे.
लॉकडाऊनचा फायदा घेत गोरगरीब, गरजू लोकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक सुरू केली आहे. दिलेल्या रकमेला भरमसाट व्याज आकारून हे खासगी सावकार तिप्पट, चौपट रक्कम वसूल करू लागले आहेत. या सावकारांच्या त्रासाने अनेकांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेची उदाहरणे आहेत. पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी या प्रश्नी लक्ष घालून खासगी सावकारांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
गेले वर्षभर कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. शेतमजूर, रोजंदार आदींच्या हाताला काम मिळत नसल्याने पोटाची खळगी कशी भरायची, या विवंचनेत हा वर्ग आहे. याचाच फायदा घेत वाळवा-शिराळा तालुक्यात खासगी सावकारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.