लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : व्याजाने घेतलेली रक्कम व्याजासह परत करूनही आणखी पैशांची मागणी करत शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी पोलिसांनी शहरातील सावकारास अटक केली. पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकून वेगवेगळे दस्तऐवज आणि ११ लाख रुपयांची रोकड हस्तगत केली. जलाल मुसा मुल्ला (रा. इस्लामपूर) असे त्याचे नाव असून, मुजम्मीन लियाकत पठाण (वय ३०, रा. इस्लामपूर) यांनी फिर्याद दिली आहे.
गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात पठाण यांनी जुना मालट्रक घेतला होता. त्याच्या काही कामासाठी त्यांना पैशांची गरज होती. त्यांचे मामा मुद्दसर गोलंदाज यांनी जलाल मुल्लाची ओळख करून दिली. पठाण यांनी त्याच्याकडून २० हजार रुपये घेतले. त्यावेळी मुल्लाने १५ टक्के व्याजाने तीन हजार रुपये कापून घेत १७ हजार रुपयांची रक्कम पठाण यांच्याकडे दिली तसेच आठवड्याला व्याज न आल्यास दुप्पट रक्कम द्यावी लागेल, असे सांगितले. त्यांच्याकडून दोन कोरे धनादेशही घेतले.
पठाण यांनी मुल्लाकडून घेतलेली मुद्दल आणि व्याज असे २३ हजारांची रक्कम परत केली होती. सोमवारी दुपारी ते मुल्ला याच्याकडे असलेले धनादेश आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी सावकार मुल्ला याने आणखी सहा हजार रुपयांची मागणी करत पठाण यांना शिवीगाळ व दमदाटी केली.
सावकार जलाल मुल्ला याला अटक केल्यानंतर पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, अरविंद काटे, हवालदार बाजीराव पाटील व पथकातील इतर पोलिसांनी मुल्ला याच्या घरी दुपारी छापेमारी केली. यावेळी पथकाच्या हाती कोरे धनादेश, चिठ्ठ्या आणि ११ लाख रुपयांची रोकड लागली. इतक्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम कुठून आली. त्यासह मुल्ला याच्या विविध बँक खात्यांची तपासणी केली जाणार असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. सहायक पोलीस निरीक्षक अरविंद काटे अधिक तपास करत आहेत.