सांगली : खरसुंडी ते मेटकी या रस्त्यावरील गायरान जागेतील तीन पानी जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकला. पथकाने पाच जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून आठ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
प्रकाश रामचंद्र गवंड (वय २७), योगेश धुळा गवंड (२७), जनार्दन तेजो पंडित (३०), मेहस दुधन पंडित (२१), गंगाधर भुवनेश्वर पंडित (३८) (सर्व रा. लोणार खोरी, आटपाडी) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथक आटपाडी परिसरात पेट्रोलिंग करीत असताना अंकुश जरग (रा. येतगाव) हा मेटकी ते खरसुंडी रस्त्यावरील गायरान जागेत तीन पानी जुगार अड्डा चालवित असल्याची माहिती मिळाली. पथकाने तातडीने त्या ठिकाणी छापा टाकला असता पाच जण तीन पानी जुगार खेळताना मिळून आले. सहाय्यक पोलीस फौजदार अच्युत सूर्यवंशी व पथकाने त्यांना ताब्यात घेतले. जुगारातील सहा हजार ९०० व दोन मोबाइल असा ७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला.