इस्लामपूर : कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी शासनाने निर्धारित केलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम घेत रुग्णाच्या मृत्यूनंतर वैद्यकीय बिलापोटी आणखी जादा रक्कम घेणे, तसेच मृतदेह ताब्यात देण्यास विलंब केल्याच्या कारणातून गुन्हा दाखल असलेल्या प्रकाश हॉस्पिटलमधील चौघांचे अटकपूर्व जामीन अर्ज येथील न्यायालयाने नामंजूर केले.
इंद्रजित दिलीप पाटील, अभिमन्यू शिवाजीराव पाटील, विश्वजित सुरेश पाटील (तिघे रा. इस्लामपूर) आणि प्रवीण बाळासाहेब माने (आष्टा) अशी चौघांची नावे आहेत. या सर्वांविरुद्ध नंदू नामदेव कांबळे (जयसिंगपूर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चौघांविरुद्ध फसवणूक, विश्वासघात आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे.
धरणगुत्ती (ता. शिरोळ) येथील सैन्य दलातील निवृत्त अधिकारी काशीनाथ शंकर कांबळे यांना २ मे रोजी कोविड उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या कुटुंबियांकडून ३ लाख ५० हजार रुपये भरून घेण्यात आले होते. उपचार सुरू असताना कांबळे यांचे १८ मे रोजी निधन झाले. त्यावर हॉस्पिटलकडून बिलापोटी आणखी २ लाख १७ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. यावेळी वरील चौघांकडून नंदू कांबळे यांना दमदाटी आणि शिवीगाळ करण्यात आली, तसेच मृतदेह ताब्यात देण्यास विलंब केला.
दरम्यान, या गुन्ह्यातील संभाव्य अटक टाळण्यासाठी वरील चौघांनी अटकपूर्व जामीन घेण्यासाठी धाव घेतली होती. या अर्जावर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश सतीश चंदगडे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यांनी या चौघांचे जामीन अर्ज नामंजूर केले.