सांगली : वसंतदादा औद्योगिक वसाहतीजवळील विद्युत दुरुस्तीचे काम करत असताना खांबावरून पडल्याने वैभव तानाजी ऐवळे (वय २६) हे कंत्राटी कामगार जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पावसामुळे अनेक ठिकाणी विद्युत यंत्रणेत बिघाड झाला आहे. वैभव ऐवळे व त्यांचे सहकारी कर्मचारी रविवारी सकाळी ११ वाजता औद्योगिक वसाहतीजवळ असलेल्या एका झोपडपट्टीजवळ काम करीत होते. त्यांचा सहकारी लाइन बंद करण्यासाठी गेल्यानंतर वैभव ऐवळे हे खांबावर चढले. अचानक ते खाली काेसळले. त्याचठिकाणी असलेल्या एका कुंपणाच्या भिंतीवर ते आदळले. या भिंतीला काही सळ्याही होत्या. त्यांचा मार छातीला लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना सुरुवातीला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.
शासकीय रुग्णालयात काही उपकरणे नसल्याने त्यांना भारती रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले. आता भारती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या जिवाचा धोका टळला असल्याचे सांगण्यात येत आहे. नेमकी घटना कशामुळे घडली, हे अद्याप समजू शकले नाही.