सांगली : जिल्ह्यातील तीन लाख १९ हजार १४३ वीज ग्राहकांकडे ९१ कोटी रुपयांची थकबाकी असून, ६१८४ ग्राहकांचा वीज पुरवठा महावितरणने खंडित केला आहे.
जिल्ह्यात पाच लाख ७९ हजार घरगुती वीज ग्राहक आहेत. त्यापैकी तीन लाख १९ हजार १४३ ग्राहकांकडे बिल थकीत आहे. त्यातील पाच हजार रुपयांपेक्षा अधिक वीज बिल थकबाकी असलेल्या ग्राहकांकडे ९१ कोटी रुपये थकीत आहेत. थकबाकी भरण्याकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी घरगुती ५४ हजार १९८ ग्राहकांपैकी ४६३६, वाणिज्य १२ हजार ७४० पैकी १२५५, तर औद्योगिक २८५० पैकी २९३ ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित केला आहे. महावितरणची आर्थिक स्थिती गंभीर असल्याने वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे.
चौकट
वीज सुरळीत राहण्यासाठी सहकार्य करा : धर्मराज पेटकर
महावितरणला वीज विकत घेऊनच ग्राहकांना द्यावी लागत आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पगारही भागवावे लागत आहेत. ग्राहकांनी अखंडित वीज पुरवठ्यासाठी वीज बिल भरावे, असे आवाहन अधीक्षक अभियंता धर्मराज पेटकर यांनी केले आहे.