सांगली : महापूर पूर्णत: ओसरण्यापूर्वीच पूरग्रस्त भागातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात महावितरणला यश आले आहे. गावभाग आणि सांगलीवाडीचा अन्यत्र वीजपुरवठा मंगळवारअखेर सुरू झाला.
पुराने बाधित होणाऱ्या भागाचा वीजपुरवठा महावितरणने टप्प्याटप्प्याने बंद केला होता. विजेमुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी ट्रान्सफाॅर्मर, वाहिन्या बंद केल्या होत्या. शेरीनाला आणि कोल्हापूर रस्त्यावरील पाण्यात जाणारी दोन वीज उपकेंद्रे बंद ठेवली. २८४ ट्रान्सफाॅर्मर आणि ११ उच्चदाब वीजवाहिन्या बंद राहिल्या, त्यामुळे पूरग्रस्त भागातील ३२,२९२ वीजग्राहक वीजपुरवठा चार दिवस बंद राहिला होता. वीज बंद राहिल्याने एकही दुर्घटना घडली नाही.
पुराचे पाणी ओसरताच कर्मचाऱ्यांनी कामाला वेग दिला. सोमवार आणि मंगळवारअखेर २४५ ट्रान्सफाॅर्मर सुरू केले. कोल्हापूर रस्त्यावरील उपकेंद्रही कार्यान्वित केले. त्यामुळे १० उच्चदाब वाहिन्या सुरू झाल्या. २७,९५६ ग्राहकांचा वीजपुरवठा पुन:श्च सुरू झाला. पुराची पातळी आणखी कमी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने उर्वरित ३९ ट्रान्सफाॅर्मर व ४,३३६ ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत केला जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या मोहिमेत कार्यकारी अभियंता विनायक इदाते, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आशिष मेहता, विजय अडके यांच्यासह प्रशासनाने सहभाग घेतला.
चौकट
वीस मीटर्स जळाली
महापुरात पाण्यात बुडाल्याने २० मीटर्स जळाली. महावितरणने ती त्वरित बदलून वीजपुरवठा सुरू केला. पुराच्या विळख्यातील शामरावनगरचा वीजपुरवठाही १०० टक्के सुरू झाला आहे. सध्या गावभाग, सांगलीवाडीचा काही भाग व बायपास रस्त्याचा काही भाग येथेच वीज बंद आहे.