सांगली : सांगली जिल्ह्यातील वाणिज्य, औद्योगिक विभागातील १ हजार ८ वीज ग्राहकांचा पुरवठा खंडित केला जाणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर यांनी दिली. साडेदहा कोटी रुपयांच्या थकबाकीपोटी ही कारवाई होणार आहे.
सांगली जिल्ह्यातील वाणिज्य व औद्योगिक वर्गवारीतील १ एप्रिल २०२०पासून एकही वीजबिल न भरलेल्या १ हजार ८ ग्राहकांकडे १० कोटी ५५ लाख रुपयांची थकबाकी आहे. या ग्राहकांचा वीजपुरवठा महावितरणकडून खंडित करण्यात येणार आहे. ही कटू कारवाई टाळण्यासाठी ग्राहकांनी वीजबिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
सांघिक व प्रादेशिक कार्यालयाच्या निर्देशानुसार थकबाकी वसुली मोहीम सुरू आहे. सांगली जिल्ह्यातील वाणिज्य वर्गवारीतील १३ हजार ८७१ ग्राहकांनी १५ कोटी ९ लाख रुपये तर औद्योगिक वर्गवारीतील २ हजार २४९ ग्राहकांनी ७ कोटी ७६ लाख रुपये वीजबिल थकबाकीचा भरणा केला आहे. उर्वरित ग्राहकांनीही थकबाकी भरून सहकार्य करावे अन्यथा नाईलाजास्तव वीजपुरवठा खंडित करण्यात येईल, असे पेठकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.