लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : महावितरण कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडले असून आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला आहे. शेतकऱ्यांना १५ दिवसांची मुदत द्यावी, अन्यथा महावितरणचे कार्यालय फोडू, असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी दिला.
सुहास बाबर म्हणाले, एका बाजूला कोरोनाचा कहर वाढत आहे. अशावेळी शासन आणि प्रशासन नागरिकांना घराबाहेर पडू नका, असे आवाहन करीत आहे. मात्र त्याचवेळी महावितरण कंपनीकडून थकीत वीज बिलासाठी शेतकऱ्यांना कसलीही पूर्वसूचना न देता कनेक्शन तोडण्यात आली आहेत. राज्यातील जनता अगोदरच कोरोनाच्या संसर्गजन्य साथीने हैराण आहे. अशात महावितरणच्या धोरणाने लोकांच्यात संताप निर्माण झाला आहे. पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कोरोना महामारीमुळे शेतीपूरक उद्योग व्यवसायावर संकट आले आहे. अशा परिस्थितीत वीज बिल माफ होणे अथवा त्यामध्ये सवलत मिळणे अपेक्षित होते. परंतु याउलट कसलीही पूर्वसूचना न देता वीज पुरवठा खंडित करणे ही बाब अत्यंत चुकीची आहे. तोडलेली कनेक्शन पूर्ववत जोडून द्यावीत, अन्यथा १५ दिवसांनी महावितरणच्या कार्यालयावर हल्लाबोल करून कार्यालय फोडू, असा इशाराही यावेळी सुहास बाबर यांनी दिला.