विकास शहा
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : नागरिकांना आरोग्य सेवा देणाऱ्या येथील ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शासकीय निवासस्थांची दुरवस्था झाली आहे. काही घरांचे दरवाजे, चौकटी, खिडक्या चोरी गेल्या आहेत. याकडे कोणाचेच लक्ष नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
येथील ग्रामीण रुग्णालयाजवळच अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी शासकीय निवासस्थान बांधण्यात आले. यास १५ वर्षे होऊन गेली. मात्र हळूहळू या निवासस्थानांना उतरती कळा लागली. येथे झुडपांचे साम्राज्य वाढू लागले आहे. या दुरवस्थेमुळे अधिकारी, कर्मचारी आपापल्या गावाकडे राहायला गेले आहेत.
यामुळे येथील निवासस्थाने दुर्लक्षित झाली आहेत.
जे कर्मचारी मोजक्याच घरात राहत होते त्यांनी आपापल्या सोयीने भिंती पाडल्या, कोणी दोन निवासस्थांमधील भिंती पडून एक केल्यामुळे राहण्यासाठी प्रशस्त जागा झाली. तर बंद असणाऱ्या अन्य घरांचे दरवाजे, खिडक्या अज्ञातांनी गायब केल्या आहेत. याकडे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.
परिसरातील सुरक्षा भिंत पाडून नागरिकांनी ये-जा करण्यासाठी जवळचा मार्गच तयार केला आहे.
या इमारतींचे दरवाजे, खिडक्या गायब झाल्या असून भिंतींना भगदाड पाडले आहे. सध्या येथे उपजिल्हा रुग्णालय झाले आहे. भविष्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या वाढणार आहे. तेव्हा त्यांनी कोठे राहायचे, असा प्रश्न निर्माण होणार आहे. यामुळे या निवासस्थानांची सुव्यवस्था करण्याची गरज निर्माण झाली आहे.