फोटो ओळ : सांगलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर पावसामुळे विविध ठिकाणी खड्डे पडले आहेत. (छाया : सुरेंद्र दुपटे)
लोकमत न्यूज नेटवर्क
संजयनगर : सांगलीत मुसळधार पाऊस व दररोज होणारी जड वाहनांची वाहतूक यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, जुना कुपवाड रस्ता, अहिल्यादेवी होळकर चौक ते विश्रामबागकडे जाणारा रस्ता, सांगलीतील मुख्य शंभर फुटी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.
रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. काहीवेळा अपघाताच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे या रस्त्यांची डागडुजी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.
सांगली शहरातील शंभर फुटी रस्ता, सिव्हील चौक ते एस. टी. स्टँड जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता, पुष्पराज चौक ते विश्रामबागकडे जाणारा मुख्य रस्ता, अहिल्यादेवी होळकर चौक ते कुपवाडकडे जाणारा जुना कुपवाड रस्ता, संभाजी कॉलनी ते काॅलेज काॅर्नरकडे जाणारा रस्ता, टिंबर एरिया परिसर, टिंबर एरिया ते रेल्वे स्थानक रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
या रस्त्यांवरून दररोज छोट्या-मोठ्या वाहनांसह हजारो प्रवाशांची ये-जा होत असते. मात्र या सर्व रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पाऊस पडल्यावर पाणी साठून राहते व चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. यामुळे रस्त्याची दुरवस्था होत आहे. रस्त्याची दुरुस्ती केली जात नसल्याने खड्डे व चिखल आंधळ्या प्रशासन व लोकप्रतिनिधींना दिसत नसल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत.