अशोक पाटील - इस्लामपूर सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या जायंटस् गु्रपमध्ये राजकीय पक्षांचा शिरकाव झाल्याची चर्चा सुरू आहे. प्रारंभी केवळ पुरुषवर्ग सक्रिय असणाऱ्या या ग्रुपमध्ये अलीकडील काही वर्षात महिलाही सहभागी झाल्या असून त्यांनी जायंटस् सहेली नावाने गु्रप तयार केला आहे. त्याला फुटीचे ग्रहण लागले असून इस्लामपूर येथे पूर्वीच्या जायंटस् सहेलीच्या अध्यक्षा डॉ. सुवर्णा माळी यांनी गेल्या तीन वर्षापासून वेगळी चूल मांडत, जायंटस् पर्ल हा नवीन गु्रप तयार केला आहे. महिलांच्या या दोन गटात धुसफूस सुरू असल्याची चर्चा आहे.इस्लामपूर शहरात २00१ मध्ये जायंटस् गु्रप आॅफ सहेलीची स्थापना झाली. पहिल्या अध्यक्षा होण्याचा मान प्रतिभा शहा यांना मिळाला. २00५ मध्ये डॉ. सुवर्णा माळी यांनी अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली. या गु्रपमध्ये काही ठराविक समाजाच्या महिलांची मक्तेदारी वाढत गेल्याने त्यांनी सहेली गु्रपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी २0१२ मध्ये जायंटस् गु्रप आॅफ पर्लची स्थापना करुन त्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरु केले. या दोन्ही गु्रपमध्ये आता राजकीय पक्षांचा शिरकाव झाला असून ग्रामीण भागातील मोठ्या गावांमध्ये आता दोन-दोन गु्रप कार्यरत होऊ लागले आहेत. कामेरी येथे माळी यांचा पर्ल गु्रप राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांशी संलग्नित आहे. यावर कडी करण्यासाठी जायंटस् गु्रप आॅफ सहेलीच्या अध्यक्षा सौ. जैना शहा यांनी रविवारी कामेरी येथे काँग्रेस पक्षाशी संलग्नित असलेल्या महिलांना हाताशी धरून नव्या गु्रपची स्थापना केली.जायंटस् गु्रप आॅफ इस्लामपूर सहेलीमध्ये काही ठराविक समाजातील महिलांनाच संधी दिली जाते, असा आरोप केला जात आहे. चांगले काम करणाऱ्या इतर समाजातील महिलांना जाणीवपूर्वक डावलले जाते. त्यातूनच डॉ. माळी यांनी जायंटस् गु्रप आॅफ पर्लची स्थापना करून सवतासुभा मांडला आहे.जायंटस् सहेली व पर्ल हे दोन्ही गु्रप राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या जायंटस् गु्रपच्या अंतर्गत सुरू आहेत. एकत्र काम करताना काही मतभेद निर्माण झाले. त्यामुळे डॉ. माळी यांनी स्वतंत्र गु्रप स्थापन केला आहे. जायंटस् गु्रप आॅफ सहेलीमध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण नाही.- संदेश शहा, स्पेशल कमेटी मेंबर, जायंटस् गु्रप.जायंटस् गु्रप आॅफ पर्लमध्ये पती- पत्नी एकत्र कार्यरत असतात. त्यामुळे सामाजिक कार्यात कमी अडचणी येतात. याउलट जायंटस् सहेलीमध्ये फक्त महिला कार्यरत आहेत. हाच दोन गु्रपमधील मूलभूत फरक आहे. त्यामुळे आमच्यात कोणतेही राजकारण असण्याचे कारण नाही. - डॉ. सौ. सुवर्णा माळी, अध्यक्षा, जायंटस् पर्ल.
इस्लामपूरच्या ‘जायंटस्’मध्ये रंगले राजकारण
By admin | Updated: March 11, 2015 00:04 IST