सांगली : जागेअभावी गेल्या सहा महिन्यांपासून प्रलंबित असलेला संजयनगर पोलीस ठाण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. माधवनगर रस्त्यावरील आयटीआय कार्यालयाच्या पिछाडीस असलेली राज्य उत्पादन शुल्क विभागाची तयार इमारत या पोलीस ठाण्यासाठी मिळाली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. येत्या महिन्याभरात या नवीत जागेत पोलीस ठाणे सुरू केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.पोलीसप्रमुख सावंत यांच्या प्रयत्नामुळे जिल्ह्यात भिलवडी (ता. पलूस), मिरजेत गांधीनगर व सांगलीत संजयनगर ही तीन नवीन पोलीस ठाणी सुरू होत आहेत. भिलवडीत जागा मिळाल्याने दोन महिन्यांपूर्वीच तिथे पोलीस ठाणे सुरू झाले आहे. संजयनगर व गांधीनगर पोलीस ठाण्यासाठी जागेचा शोध सुरू होता. अखेर हा शोध थांबला आहे. आयटीआय कार्यालयाच्या पिछाडीस राज्य उत्पादन शुल्क विभागाची तयार इमारत आहे. सहा एकर जागेत ही इमारत आहे. कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी ही दुमजली इमारत बांधण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात या इमारतीचा वापर झाला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून ही इमारत धूळ खात पडून आहे. त्यामुळे सावंत यांनी या इमारतीत पोलीस ठाणे सुरू करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांना सादर केला होता. त्यास नुकतीच मंजुरी दिली आहे. सावंत म्हणाले की, या इमारतीची दुरवस्था झाली आहे. त्याची दुरुस्ती करण्याचे काम सुरू केले आहे. प्रभारी निवासी पोलीस उपअधीक्षक रवींद्र डोंगरे यांच्याकडे या कामाची जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्याकडे पोलीस ठाण्याचा कार्यभार सोपविला जाणार आहे. (प्रतिनिधी)प्रस्ताव प्रलंबितजिल्हा पोलीसप्रमुख सावंत म्हणाले की, सांगलीत दक्षिण शिवाजीनगर व संख (ता. जत) येथे या दोन पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव प्रलंबित आहे. मात्र दक्षिण शिवाजीनगर ठाण्याची गरज नाही. संखला मात्र ठाणे होण्याची गरज आहे. भविष्यात इस्लामपूरलाही आणखी पोलीस ठाणे होण्याची गरज आहे. यासाठी नव्याने प्रस्ताव तयार करून पाठपुरावा केला जाईल.
महिन्याभरात संजयनगरमध्ये पोलीस ठाणे सुरू होणार!-- लोकमतचा प्रभाव
By admin | Updated: November 24, 2014 23:04 IST