लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : आव्हानात्मक गुन्ह्यांचा तपास करून मुद्देमाल जप्त करीत गुन्हेगारांना अटक करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्रजासत्ताकदिनी पोलीस संचलन मैदानावर झालेल्या कार्यक्रमात हा सत्कार करण्यात आला.
अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी मोहोळ येथे कार्यरत असताना केलेल्या तपासाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.
यासह जबरी चोरी करणाऱ्या टोळीस दहा लाख रुपयांसह जेरबंद करणाऱ्या उपअधीक्षक अजित टिके, सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील, सिकंदर वर्धन, रवींद्र आवळे, आसिफ सनदी आदींचा सत्कार करण्यात आला.
यासह उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, विशाला पाटील, कालिदास गावडे, दत्तात्रय कोळेकर, नामदेव दांडगे यांचाही सत्कार करण्यात आला.
शेगाव येथील सव्वादोन काेटींचा दरोडा उघडकीस आणत संपूर्ण मु्द्देमाल जप्त करणाऱ्या एलसीबीच्या पथकाचाही गौवर करण्यात आला. पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्यासह अधिकाऱ्यांना यावेळी गौरव प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर अधीक्षक मनीषा दुबुले यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.