जत : तालुक्यातील शेगाव येथे हॉटेलमध्ये विनापरवाना गॅस सिलिंडर वापरत असल्याची दमदाटी करीत चौघा पोलिसांनी दहा हजार रुपयांची मागणी केली. हॉटेलमध्ये जेवण व मद्यपान करून त्याचे पैसेही दिले नाहीत. शिवाय हॉटेलमधील दोन गॅस सिलिंडर गाडीत घालून नेल्याची तक्रार हॉटेलचालक बिरा हणमंत सोलनकर यांनी केली आहे. हा प्रकार २६ जानेवारी रोजी दुपारी अडीचच्या सुमारास घडला. यासंदर्भात प्रत्यक्ष जिल्हा पोलीसप्रमुखांना भेटून सोलनकर यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्यन करणार आहे, अशी माहिती आमदार विलासराव जगताप यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब कत्ते, दिलीप वायकर आणि सहायक पोलीस निरीक्षक सुभाष कांबळे व जीपचालक हरी खंडागळे हे चारजण गाडीतून (क्र. एमएच १०/एन ६६६) २६ जानेवारी रोजी दुपारी शेगाव येथील सोलनकर यांच्या हॉटेलमध्ये आले. हॉटेलमध्ये आल्यानंतर सर्वांनी मद्यपान व जेवण केले. त्यानंतर त्यांनी गॅस सिलिंडरचा परवाना आहे का?, अशी विचारणा केली. हॉटेल मालक परवाना असल्याचे सांगून तो आणण्यासाठी आतमध्ये गेले. यादरम्यान हॉटेलमधील दोन गॅस सिलिंडर गाडीत घालून चौघेही तेथून निघून गेले.गॅस सिलिंडर घेऊन सुमारे चार-पाच किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर बाबूराव बागल या मध्यस्थामार्फत त्यांनी सोलनकर यांना दूरध्वनी केला आणि प्रकरण मिटविण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी केली. बागल यांच्यामार्फतच पाच हजार रुपयांवर तडजोड केली; मात्र सोलनकर यांनी गॅस सिलिंडर परवाना असल्याने पैसे देण्यास नकार देत ‘त्यांना नियमानुसार कारवाई करू दे’ असे सांगून दूरध्वनी बंद केला. पोलीस अधिकारी व कर्मचारी हॉटेलमध्ये येऊन मोफत जेवण व मद्यपान करून परवाना असलेले गॅस सिलिंडर गाडीत ठेवून निघून गेले. यावेळी त्याठिकाणी दत्तात्रय माने, संभाजी सोलनकर, तानाजी यमगर, सचिन सूर्यवंशी उपस्थित होते, असेही आमदार जगताप यांनी सांगितले.दरम्यान, यासंदर्भात पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी जत विभागाचे प्रभारी पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे करत आहेत. (वार्ताहर)
शेगावमध्ये हॉटेल चालकाला पोलिसांची दमदाटी
By admin | Updated: February 8, 2015 00:56 IST