सांगली : अडचणीच्यावेळी पैशांची मदत करून त्यानंतर अव्वाच्या सव्वा व्याजाची वसुली करणारे सावकार आता पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यानुसार जिल्ह्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या सावकारीस लगाम घालण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. सावकारांच्या त्रासाला बळी पडलेल्या व्यक्तींनी आपली तक्रार दाखल करावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी केले आहे.
जिल्ह्यात खासगी सावकारीच्या अनेक घटना घडत आहेत. त्यामुळे अनेकांची आर्थिक पिळवणूकही होत आहे. त्यामुळे अशा सावकारांवर कारवाईसाठी आता पाेलीस अधीक्षक कार्यालयात विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. यात पिडितांनी आपला अर्ज द्यायचा आहे. त्यात सावकार कर्ज कसे देतो, व्याजाचे हप्ते कोणाकडून गोळा करतो, यासह सावकाराने मालमत्तेचे दस्ताऐवज स्वत:च्या ताब्यात ठेवले आहेत का? व तो चेकची भीती घालून व्याजाची वसुली करत आहे का? अशी माहिती द्यायची आहे. सावकाराची एकूण स्थावर व जंगम मालमत्ता किती व कोठे आहे, याचीही माहिती द्यावी.
कार्यालयाकडे अर्ज करताना कोणीही निनावी तक्रार देऊ नये, शिवाय खोटी माहिती देऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.