लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : विटा शहरासह खानापूर तालुक्यात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली. विटा शहरात गुरुवारी पहाटेपासूनच पोलिसांनी चौका-चौकांत नाकेबंदी करून वाहनांची तपासणी मोहीम सुरू केली होती. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलिसांनी लाठीचा प्रसाद दिला.
पोलीस उपअधीक्षक अंकुश इंगळे, निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली शहरासह तालुक्यात सकाळपासूनच कडक अंमलबजावणी सुरू केली होती. शहरातील अडगळीतील सर्व रस्ते बंद केले होते. प्रमुख मार्गांवरील चौकात नाकाबंदी करून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात होती. त्यावेळी विनाकारण व विनामास्क रस्त्यांवर फिरणाऱ्याना पोलिसांनी चोप दिला. गुरुवारी शहरातील बाजारपेठ पूर्ण बंद होती; तर रस्त्यावर पूर्ण शुकशुकाट होता.
दरम्यान, खानापूर तालुक्यातील ग्रामीण भागातही लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली. लेंगरे, खानापूर, भाळवणी, आळसंद, पारे, माहुली या प्रमुख गावांसह तालुक्यातील सर्वच गावांत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी झाली. भाजीपाला, किराणा माल यांसह बाजारपेठ पूर्ण बंद राहिल्याने नागरिकांचे हाल झाले.