मिरज : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त महिला स्वयंसाहाय्यता समूहातील महिलांशी पंतप्रधानांनी थेट ऑनलाईन संवाद साधला. या कार्यक्रमास मिरज पूर्व भागातील महिलांनी प्रतिसाद दिला. आरग-बेडग परिसरातील महिला या ऑनलाइन कार्यक्रमात सहभागी झाल्या हाेत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर नारी शक्ती से संवाद’ या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील स्वयंसाहाय्यता गटातील महिलांशी संवाद साधला. यावेळी महिला बचत गटांना २० लाखांपर्यंत विनातारण कर्ज उपलब्ध करण्याची घोषणा करून प्रत्येक महिलेने आत्मनिर्भर बनावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्र शासनातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशातील स्वयंसाहाय्यता गटातील महिलांशी संवाद साधला. मिरज पंचायत समितीतर्फे आयोजित या कार्यक्रमात लॅपटॉप, प्रोजेक्टर व मोबाईलद्धारे मिरज पूर्व भागातील महिला सहभागी झाल्या.
बेडग येथील महिलांनी तिरंगा रंगाच्या साड्या परिधान करून राष्ट्रगीत गायन केले. आरग येथील झलकारी ग्रामसंघातर्फे अध्यक्षांनी बिरोबा माळ येथील जिल्हा परिषद शाळेत, कोषाध्यक्षांनी पाटील गल्ली येथील बिरोबा मंदिरात, सचिवांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातून सहभाग घेतला. याशिवाय अशोकनगर (पवार वस्ती), आरग येथे प्राजक्ता, वत्सला, सहेली, शिवतीर्थ, नवजीवन या स्वयंसाहाय्यता समूहांतील महिलांनी एकत्र येऊन संगणकावर या कार्यक्रमात सहभाग घेतला. आरग ग्रामपंचायतीतर्फे ग्रामपंचायत सभागृहात महिला बचत गटातील महिलांसाठी प्रोजेक्टर उपलब्ध करून देण्यात आला हाेता. यावेळी ग्रामसेवक कोरे, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मिरज पंचायत समितीच्या रेशमा सातपुते, बँक सखी शशिकला गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिका बाबर, मनीषा माने, कांचन जाधव, नंदिता खटावे, अश्विनी पाटील, विजयमाला पाटील, शोभा निकम, स्वप्नाली गायकवाड यांनी संयोजन केले.