सांगली : मिरजेतील शासकीय वैद्यकीय महााविद्यालयाच्या पिछाडीस असणाऱ्या महापालिकेच्या मालकीच्या भूखंडावर प्लॉट पाडून त्यांची विक्री करण्याचा प्रकार घडला आहे. उच्च न्यायालयानेही महापालिकेच्या बाजूने निकाल देऊनही महापालिकेने याबाबत कोणतीही कारवाई केली नाही, अशी माहिती मनसेचे कार्यकर्ते आशिष कोरी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, मिरज येथील विकसक बबन लवटे यांनी मिरज शहरातील महापालिकेच्या मालकीचा भूखंड (सर्व्हे क्र. ९/२, ३, ४, ५ आणि सर्व्हे क्र. ४३७७, ४३७0) परस्पर हडप करून बोगस रेखांकनाद्वारे त्यावर प्लॉट पाडले आहेत. १५ जणांना प्लॉट विकलेले आहेत. या जमिनीचे मूळ मालक भाऊ सातवेकर हे होते. या जमिनीपैकी २५ हजार ४९८.0८ चौरस मीटर जमीन ही कमाल जमीन धारणा कायद्यांतर्गत अतिरिक्त ठरवून ती महाराष्ट्र शासनाने ताब्यात घेतली होती. शासनाने ही जमीन तत्कालीन नगरपालिकेला दिली. नगरपालिकेने जमिनीचे रितसर मूल्यांकन करून त्याची किंमत सातवेकर यांना दिली. सातवेकरांनीही ही रक्कम स्वीकारली होती. सात-बारा उताऱ्यावर महापालिकेचे नावही लागले आहे. सातवेकर कुटुंबियांनी तत्कालीन नगरपालिकेविरुद्ध १९८२ पासून अनेक दावे व हरकती न्यायालयाकडे व शासनाकडे दाखल केले होते. १३ आॅगस्ट २0१४ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने ही जागा महापालिकेची असल्याचा निकाल दिला. त्यानंतर यावर महापालिकेची मालकी कायम झाली आहे. महापालिकेने या जागेची मालकी स्वत:कडे असूनही त्याचे योग्य नियोजन केले नाही. त्याठिकाणी फलक लावून जागेला कुंपण घालून ती जागा सुरक्षित करण्याची मागणी आपण आयुक्तांकडे केल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मिरजेत पालिकेचा भूखंड विकला
By admin | Updated: December 2, 2014 00:13 IST