फोटो एडिटोरियलवर ०९ सांगली ०१ ओळी : वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या दालनात मंगळवारी बैठक झाली. यावेळी पृथ्वीराज पाटील, डॉ. तात्याराव लहाने, आप्पासाहेब बोळाज, चंद्रकांत पाटील, अजय देशमुख आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : राज्य कामगार विमा योजनेच्या आरोग्य सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये स्वतंत्र कक्ष करून विमाधारकांना मिळाव्यात, यासाठी केंद्र सरकारने काही रकमेची तरतूद सरकारी रुग्णालयांमध्ये करावी, यासाठी सांगली जिल्ह्यासाठीचा पथदर्शी प्रकल्प केंद्र सरकारला पाठविण्याची सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
याबाबत मंगळवारी मंत्रालयातील त्यांच्या दालनात बैठक पार पडली. यावेळी वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, राज्याचे कामगार आयुक्त आप्पासाहेब बोळाज, उद्योजक चंद्रकांत पाटील, अजय देशमुख, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील उपस्थित होते.
पृथ्वीराज पाटील यांनी कामगार विमा योजनेच्या या सुविधांबाबतचा मुद्दा मार्गी लागावा, यासाठी देशमुख यांना पत्र दिले होते. त्यानुसार त्यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. देशमुख यांनी याबाबत प्रस्ताव सूचवला.
कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या उपचारासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या शासकीय रुग्णालयांमध्ये काही रकमेची तरतूद केंद्र सरकारने करावी आणि त्यातून या सुविधा देण्यात याव्यात. प्रत्येक जिल्ह्यात किमान ४० हजार ते ५० हजारांहून अधिक कामगारांचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे. केंद्र सरकारने हमी देऊन हा निधी पुरवला, तर शासकीय अथवा खासगी हॉस्पिटलमध्ये सुविधा देणे सोपे जाईल. त्यानुसार सांगली जिल्ह्याचा एक पथदर्शी प्रकल्प पहिल्यांदा केंद्राकडे पाठवावा, तो यशस्वी झाला, तर अन्य जिल्ह्यांचा प्रस्तावही पाठवता येईल, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.
राज्य कामगार विमा योजना केंद्र व राज्य सरकारकडून चालवली जाते. या विम्याची रक्कम कामगार आणि उद्योजक यांच्याकडून वसूल केली जाते, परंतु पैसे भरूनसुद्धा कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होत नाहीत. कामगारांना आरोग्य सुविधा देण्याची ही योजना खासगी रुग्णालयांशी जोडण्यात आली आहे, परंतु या रुग्णालयांना वेळेवर पैसे मिळत नसल्याने त्यांनी आरोग्य सुविधा देणे पूर्णपणे बंद केले आहे. त्यामुळे त्यांचा हा प्रश्न मार्गी लागावा, अशी मागणी पृथ्वीराज पाटील यांनी यावेळी केली होती.