सांगली : मालवाहतुकीची पिकअप मागे घेताना दीड वर्षाची चिमुरडी चाकाखाली सापडून जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी घडली होती. स्वराली सचिन आलदर (रा. धनगर गल्ली, वानलेसवाडी) असे बालिकेचे नाव आहे. याप्रकरणी पिकअप विश्रामबाग पोलिसांनी जप्त केला आहे. चालक सुनील पांडुरंग सरगर (वय ३०, रा. लक्ष्मीनगर, जुना बुधगाव रस्ता, सांगली) याच्यावर गुन्हा दाखल झाला असून, अद्याप अटक करण्यात आली नाही. पोलिसांनी पिकअप जप्त केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्वरालीचे वडील सचिन आलदर हे फळविक्रेते आहेत. सोमवारी दुपारी ते पिकअपने (एमएच १० एक्यू ४०५३) व्यापारासाठी निघाले होते. यावेळी चालक सुनील सरगर मोटार चालवत होता, तर सचिन आलदर त्याच्या शेजारी होते. गाडी पाठीमागे घेत असताना स्वराली खेळत होती याचे भानच त्यांना नव्हते. अचानकपणे क्लिनर बाजूच्या चाकाखाली ती आली. त्यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर विश्रामबाग पोलिसांत या घटनेची नोंद करण्यात आली असून, पिकअप जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.