लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : बेडग (ता. मिरज) येथे ऐतिहासिक बावाच्या विहिरीत १७९३ मधील पेशवेकालीन शिलालेख आढळून आला. ही विहीर गिरी संप्रदायातील साधूंनी बांधली असून, हिंदू आणि मुस्लीम व्यक्तींनी विहिरीचा बंदोबस्त ठेवावा, असा उल्लेख या लेखात आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर आणि प्रा.गौतम काटकर यांनी या शिलालेखाचा अभ्यास केला आहे.
बेडग हे ऐतिहासिक गाव आहे. प्राचीन काळापासूनच्या अनेक वास्तू या गावात आढळतात. हे गाव सरदार घोरपडे यांचे इनाम गाव होते. घोरपडे सरकारांनी गावात अनेक वास्तू बांधल्या. बेडगच्या प्राचीनत्वाची साक्ष देणारा इसवी सन १२२२चा एक यादवकालीन शिलालेख मिरज इतिहास संशोधन मंडळास दोन वर्षांपूर्वी महादेव मंदिरात आढळला होता. आता आणखी एक पेशवेकालीन शिलालेख गावात आढळला आहे. बावाची विहीर हा बारवस्थापत्याचा वैशिष्ट्य़पूर्ण नमुना आहे. घडीव दगडांमध्ये बांधलेली ही बारव पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. पायऱ्या उतरताना भिंतीत वरील बाजूस सात ओळींचा एक शिलालेख आहे. या शिलालेखात उजव्या बाजूस तीन आडव्या ओळीतही लेख कोरला आहे. लेख देवनागरीमध्ये असून, त्याचा अभ्यास प्रा. गौतम काटकर आणि मानसिंगराव कुमठेकर यांनी केला आहे. या लेखाच्या अभ्यासासाठी दिगंबर कोकाटे आणि गजानन कोकाटे यांचे सहकार्य लाभले.
बेडगेतील गिरी संप्रदायाच्या साधूंनी भवानीच्या देवळाजवळ सन १७९३ मध्ये धर्मशाळा आणि विहीर बांधली असून, या विहिरीचे संरक्षण हिंदू-मुस्लीम समाजातील अधिकारी आणि व्यक्तींनी करावे, असे या शिलालेखात म्हटले आहे. या शिलालेखात बेडग गाव अमिर-उल-उमराव नरसिंगराव घोरपडे यांच्याकडे इनाम असल्याचेही म्हटले आहे.
चौकट
गिरी संप्रदायाचा इतिहास उलघडणार
या शिलालेखातून तत्कालीन गिरी संप्रदायाचा इतिहास उलगडणार आहे. गिरी संप्रदायाचा प्रसार तत्कालीन मिरज प्रांतात मोठ्य़ा प्रमाणात झाला होता. गिरी संप्रदायाचे हे साधू दानशूर होते. त्यांनी मिरज प्रांतातील अनेक गावांत मंदिरे, धर्मशाळा, विहिरी, हौद, मठ बांधले. पेशवेकालीन गिरी गोसाव्यांच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी हा शिलालेख उपयुक्त ठरणार आहे.