सांगली : वाहन शोरुम्स व कृषी अवजार केंद्रे सुरू करण्यास परवानगीची मागणी ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने केली आहे. तसे निवेदन सोमवारी पालकमंत्री जयंत पाटील यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील वाहन उद्योग २०१९ च्या महापुरापासून अडचणीत आला आहे. ऑटोमोबाईल डिलर्स लहान व मध्यम उद्योग श्रेणीत नोंद आहेत. शासनाने या श्रेणीतील औद्योगिक वसाहतीमधील उद्योग सुरू ठेवण्याचे धोरण अवलंबले आहे, त्याच धर्तीवर वाहन उद्योगालाही व्यवसायासाठी परवानगी द्यावी.
शोरुम्स सुरू राहिल्याने कोरोनायोद्धे व कोरोना पीडित नागरिकांच्या दुचाकी, चारचाकी, रुग्णवाहिका व अत्यावश्यक वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना तत्काळ सेवा उपलब्ध होईल. सध्या शेतीचा पेरणी हंगाम सुरू असून शेतकऱ्यांनाही सेवा पुरविणे गरजेचे आहे. ट्रॅक्टर व शेती अवजारांची दुरुस्ती गरजेची आहे. त्यासाठी अधिकृत सेवा केंद्रे सुरू ठेवण्यासाठीही परवानगी मिळावी. ऑटोमोबाईल डीलर असोसिएशनने गेल्या वर्षभरात दोन हजारहून अधिक कर्मचाऱ्यांसह लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोर पालन केले आहे. येत्या काळातही काळजी घेतली जाणार असल्याने व्यवसायाला परवानगी द्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, सचिव केदारी माने, पश्चिम महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष अविनाश पोरे यांनी निवेदन दिले.