लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मतदारांमध्ये मतदान करण्याविषयी वाढत असलेली जागृती व प्रशासनानेही सुरू केलेल्या प्रबोधन मोहिमेचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या चार निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढताना दिसत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत चुरशीने मतदान होतच असते मात्र, गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीतही टक्केवारीत वाढ झाल्याने जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढताना दिसत आहे.
निवडणुकीसाठी मतदान म्हणजे अनेकांना सुटीचा दिवस वाटतो त्यामुळे अनेकदा अपेक्षित मतदान होताना दिसत नाही. मात्र, जिल्ह्यात तरूण मतदारांची संख्या वाढत असल्यानेही मतदानाचे प्रमाण वाढत आहे. यासाठी प्रशासनानेही चांगले नियोजन केले आहे. केवळ निवडणुकीपुरतेच प्रबोधन न करता तरूण मतदारांना थेट कॉलेजवर जाऊन तर सोशल मीडियावरूनही मतदानाबाबत जनजागृती वाढत आहे. त्यामुळे नवमतदार नोंदणीसह प्रत्यक्ष मतदानातही टक्केवारी वाढत आहे.
चौकट
लोकसभा निवडणुकीत टक्का वाढला
२०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत ६३.४७ टक्के मतदानाची नोंद झाली होती. या पंचवार्षिकमध्ये तरूण मतदारांची संख्या वाढल्याने मतदानासाठी सुलभ केंद्राची व्यवस्था झाल्याने २०१९ मध्ये मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाल्याचे दिसून आले. २०१९ ला लोकसभा निवडणुकीत मोठी टशन दिसून आली आणि मतदानाचा टक्का वाढत ६५.३८ टक्के मतदान झाले होते.
चौकट
विधानसभेतही चुरस
जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. २०१४ व २०१९ या दोन्ही वर्षी विधानसभेला चुरशीने मतदान झाले. २०१४ साली सरासरी ६५ ते ६६ टक्के असलेल्या मतदानात वाढ होत २०१९ ला ६८ टक्के मतदानाची सरासरी नोंदणी झाली. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही टक्का वाढला होता.
चौकट
ग्रामपंचायत निवडणुकीत विक्रमी मतदान
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. यातील अनेक गावात तब्बल ८५ ते ८७ टक्के मतदानाची नोंदणी झाली. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीसाठी झालेल्या मतदानाची सरासरी टक्केवारी ७६ ते ७८ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने गेल्या चार निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत सर्वाधिक मतदानाची नोंदणी झाली.