लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : संचारबंदीच्या काळातही अकारण शहरात, गावात फिरणाऱ्यांमुळे संसर्ग वाढत आहे. अशा विनाकारण फिरणाऱ्यांची अचानक अँटिजन टेस्ट केल्यानंतर जिल्ह्यात तब्बल ४७ लोक पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाचे हे प्रसारक रोखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे बनले आहे.
सांगली जिल्ह्यात विटा, इस्लामपूर, सांगली, मिरज, कुपवाड याठिकाणी विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपिड अँटिजन चाचणी करण्याची मोहीम राबविण्यात आली. यात इस्लामूर येथे सर्वाधिक ३० रुग्ण आढळून आले. सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रात १०, खानापूर तालुक्यात ७ जण पॉझिटिव्ह आले. वारंवार तीच कारणे देऊन अनेक कोरोना प्रसारक फिरताना आढळताहेत. कोरोना झालेल्या व गृह विलगीकरणात असलेल्या लोकांनीही कोरोनाचा प्रसाद वाटण्याचे काम सुरू केले आहे. दंड भरू; पण आम्ही फिरू, अशा मानसिकतेतून हे लोक बाहेर येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग रोखणे कठीण बनत चालले आहे.
पोलिसांनी अडविले तर अशी कारणे सांगून सुटका करीत हे लोक भटकंती करताना दिसत आहेत. अनेकांना एकदा दंड केल्यानंतरही ते रस्त्यावर येत आहेत. भाजी व फळे विक्रेते, विविध व्यावसायिकही दंड भरून छुपा व्यवसाय करताना आढळत आहेत. मॉर्निंग व इव्हिनिंग वॉकला जाणाऱ्यांनीही यात भर टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यांनाही दंड आकारला तरी दंड भरून ते पुन्हा रस्त्यावर येत आहेत.
चौकट
जिल्ह्यातील एकूण रुग्ण १०६९४५
एकूण कोरोनामुक्त ८९,९५४
दुसऱ्या लाटेत रिकामटेकड्यांची केलेली तपासणी ४५०
त्यात आढळलेले पॉझिटिव्ह ४७
चौकट
कारणे तीच...कोणाचा दवाखाना, तर कोणाची भाजीपाला खरेदी
जिल्ह्यात अकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी अडवले की तीच ती कारणे सांगितली जात आहेत.
कोणी मेडिकलमधील औषधी आणायला जात असल्याचे, कोणी दवाखान्याचे कारण सांगत आहेत.
दूध व किराणा मालाचे किरकोळ विक्रेते असल्याचे सांगूनही पोलिसांच्या कारवाईतून सुटका करून घेणारेही आहेत.
चौकट
महापालिका क्षेत्रात येथे केली तपासणी
सांगलीत शिवशंभो चौकात, विष्णुआण्णा फळमार्केटमध्ये, कुपवाड तसेच मिरजेच्या दत्त चौकात अकारण फिरणाऱ्यांची तपासणी करण्यात आली होती. त्याठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.