शिराळा : तालुक्यातील पूरबाधित गावांमधील आरोग्य, पाणीपुरवठा व स्वच्छता याबाबींकडे लक्ष देऊन कुटुंबांचे व शेतीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी मंगळवारी दिल्या. यावेळी त्यांनी शासनाच्या मदत वाटपासंदर्भात नियोजन करण्याचे आदेशही दिले.
येथील तहसीलदार कार्यालयात आयोजित पूरपरिस्थितीबाबत आढावा बैठक झाली. यावेळी आमदार मानसिंगराव नाईक, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी अनिल बागल, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार उपस्थित होते. डाॅ. चौधरी यांनी तालुक्यातील पूरग्रस्त भागाचीही पाहणी केली.
तहसीलदार शिंदे म्हणाले की, तालुक्यामध्ये पूरबाधित २१ गावे असून, त्यापैकी देववाडी गाव पूर्णतः बाधित होते. उर्वरित २० गावे अंशतः बाधित झालेली आहेत. एकूण १२८७ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले. आजअखेर ८९७ कुटुंबांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. पूरबाधित गावांमधील ३,८१४ जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. त्यातील ८ जनावरे मयत झाली आहेत. ८५ घरांची पडझड झालेली असून, त्यापैकी २ घरे ही पूर्णतः पडलेली आहेत. ६,५०० हेक्टर शेतीचे नुकसान झालेले आहे, तर ११२ व्यावसायिक आस्थापनांचे नुकसान झाल्याचे सांगितले.
यावेळी मौजे कांदे येथील पूरबाधित ४७ कुटुंबांना शासनाचे मोफत अन्नधान्य वाटप करण्यात आले. शिंगटेवाडी येथे मोरणा नदीच्या पुरामुळे शेतीच्या नुकसानीची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली.