फोटो - शिराळे खुर्द येथे अवघ्या आठच दिवसांत नवीन पुलाचा भाग कोसळला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुनवत :
शिराळे खुर्द (ता. शिराळा) येथे वारणा डावा कालव्यावर नुकत्याच बांधलेल्या पुलाचा भाग अवघ्या आठ दिवसांतच कोसळला आहे. यामुळे तेथून जाणारा रस्ताच बंद होणार असल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे. काम निकृष्ट झाल्यानेच हा प्रकार झाल्याचे निदर्शनास येत आहे.
शिराळे खुर्द येथे पाटबंधारे विभागामार्फत वारणा कालव्यावर आठ दिवसांपूर्वीच नवीन आरसीसी पूल उभा करण्यात आला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना संरक्षक कठडे बांधून तेथे केवळ मातीचा भराव टाकण्यात आला आहे. गुरुवारी झालेल्या पहिल्याच मोठ्या पावसात पुलाच्या पूर्वेकडील बाजूचा संरक्षक कठडा तुटून भरावासह कालव्यात वाहून गेला आहे. त्यामुळे येथील रस्ता बंद होण्याच्या मार्गावर आहे.
पुलाचे काम निकृष्ट असल्याचे निदर्शनास येत आहे. संबंधित ठेकेदाराने हे काम केवळ घाईगडबडीत केल्याचा आरोप ग्रामस्थांतून होत आहे.
पाटबंधारे विभागाच्या कोकरूड कार्यालयाने या कामाबाबत योग्य ते लक्ष देण्याची गरज होती; मात्र तसे न झाल्याने या कामाचा अल्पावधीतच खेळखंडोबा झाला आहे. येथे तातडीने दुरुस्ती व दगडी पिचिंगचे काम करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.