सांगली : छोटे व्यावसायिक म्हणून दोन वर्षांत लॉकडाऊनमुळे पानपट्टीचालक आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांना कोणतीही मदत शासन देणार नसेल, तर किमान इतर व्यावसायिकांप्रमाणे पार्सल सेवा देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी सांगली जिल्हा पान असोसिएशनने केली आहे.
संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना बुधवारी निवेदन दिले. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या महामारीमुळे २०२० मध्ये लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे मागील वर्षी पान दुकाने ३ महिने बंद ठेवून व्यावसायिकांनी शासनास सहकार्य केले होते. या आर्थिक संकटातून अजूनही पान दुकानदार बाहेर पडले नाहीत, तोपर्यंत २०२१ मध्ये पुन्हा कोरानाने डोके वर काढल्यामुळे लॉकडाऊन करण्यात आला आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून सांगली जिल्ह्यातील सहा हजार पान दुकाने बंद असल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा तरी कसा, असा प्रश्न त्यांना सतावत आहे. त्यांच्या कुटुंबातील सुमारे २० हजार लोकांची उपासमार सुरू आहे. शासनाने व जिल्हा प्रशासनाने ज्यावेळी निर्बंध कडक केले आहेत त्यावेळी पान दुकानदारांनी सहकार्य केले आहे; परंतु आता पान दुकानदारांची परिस्थिती बिकट झाल्याने शासनाने सहकार्य करावे. नियम व अटी घालून पानपट्टीचालकांना इतर व्यवसायिकांप्रमाणे सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत दुकानातून पार्सल सेवा सुरू करण्यास परवानगी मिळावी.