इस्लामपूर येथून पंढरपूर येथे गेलेल्या सायकल रॅलीतील महाजलतरण ग्रुपचे सदस्य.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : सायकल चालवा आणि प्रदूषण टाळा, असा संदेश देत येथील महाजलतरण सायकलिंग ग्रुपच्या २६ सदस्यांनी १८ तासांत इस्लामपूर ते पंढरपूर व परत पंढरपूर ते इस्लामपूर अशी सायकल रॅली काढून ३३२ किलोमीटरचा प्रवास करून पूर्ण केली. सायकल चालवा, पर्यावरण वाचवा, इंधन वाचवा, सायकल चालवा, आरोग्य राखा, अशा
प्रबोधनात्मक जनजागृतीचा उद्देश ठेवून सामाजिक बांधीलकी जपली. गेल्या ३ वर्षांपूर्वी महाजलतरण सायकलिंग ग्रुपची स्थापना झाली. यापूर्वी त्यांनी चांदोली, कराड, सांगली, औदुंबर, मच्छिंद्रगड, मल्लिकार्जुन, शिराळा नाथ मंदिर, डोंगरवाडी, सागरेश्वर अशा अन्य ठिकाणी जाऊन सायकल चालवा, प्रदूषण टाळा, असे आवाहन करीत स्वच्छता अभियानही राबविले आहे. या ग्रुपने दररोज ३५ ते ४० कि.मी. सायकलिंगचे सातत्य ठेवले आहे.
गुरुवारी पहाटे ३.३० वाजता येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून ही सायकल रॅली पंढरपूरला रवाना झाली. सायकल रॅलीचे विटा येथे सायकल क्लबच्या सदस्यांनी तसेच न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी स्वागत केले. सायकल रॅली पंढरपूर येथे पोहोचल्यानंतर सोलापूरचे उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, मुख्याधिकारी अरविंद माळी, गणपत पवार यांनी स्वागत केले.
दुसऱ्या दिवशी रॅली इस्लामपूर येथे आल्यानंतर नगरसेवक विक्रम पाटील, अभियंता संघटनेचे संस्थापक महेश मोरे, आदर्श बालकमंदिरचे पर्यवेक्षक राजेंद्र जाधव, विकास जाधव, नामदेव जाधव, आकाश टोपरे, शीला फडतरे, प्रतिभा जाधव यांनी स्वागत केले.