पलूस : केंद्र सरकारने गॅस ग्राहकांच्या खात्यामध्ये अनुदान जमा करावे, पेट्रोल व डिझेल दरवाढ मागे घ्यावी, शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत, अशा मागण्यांचे निवेदन पलूस तालुका काँग्रेसच्यावतीने तहसीलदार निवास ढाणे यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिलपासून घरगुती गॅस सिलिंडर ग्राहकांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमाच केली नसल्याचे समोर आले आहे. कोणतेही आदेश किंवा घोषणा न करता अनुदान बंद करण्यात आले आहे. हा सरळसरळ अन्याय आहे. ग्राहकांच्या खात्यात अनुदानाची रक्कम त्वरित जमा करावी. सध्या डिझेल व पेट्रोल दरवाढ मोठ्या प्रमाणावर होत आहे. ही दरवाढ मागे घ्यावी. दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. अन्यायकारक शेती कायदे रद्द करावेत.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, तालुकाध्यक्ष ए. डी. पाटील, खाशाबा दळवी, गटनेते सुहास पुदाले, उदय सूर्यवंशी, गणपतराव सावंत, डॉ. मीनाक्षी सावंत, विश्वास पाटील, श्वेता बिरनाळे, गिरीश गोंदिल, सर्जेराव पवार, रतन पाटील उपस्थित होते.