पलूस : पलूस तालुक्यात महापुराला दीड महिना उलटून गेला तरी शासनाने पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान व नुकसानभरपाई दिलेली नाही. तातडीने मदत करण्यात यावी, या मागणीसाठी भाजपच्या वतीने मंगळवारी पलूस तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा धडक मोर्चा काढण्यात आला.
पृथ्वीराज देशमुख म्हणाले की, शेतकऱ्यांचा आक्रोश राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोर्चा काढला आहे. भाजप आंदोलनाच्या पायावर आजपर्यंत वाढत आली आहे. साहजिकच आंदोलने राज्यकर्त्यांच्या विरोधात असतात. त्यामुळे आंदोलनाला मिळालेला तरुणांचा पाठिंबा आगामी काळात सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी वाढवणारा ठरू शकतो.
संग्रामसिंह देशमुख म्हणाले की, दोन महिन्यांपूर्वी आलेल्या महापुराच्या काळातील पूरग्रस्तांना अजूनही शासकीय मदत मिळालेली नाही. यावरूनच आघाडी सरकारचा पूरग्रस्तांविषयी असलेला खोटा कळवळा सिद्ध होतो. देवेंद्र फडणवीस सरकारने पूरग्रस्तांना दुसऱ्याच दिवशी मदत देऊन त्यांचे संसार सावरण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मागील पुरात जे विरोधी बाकावर बसून भाजपच्या विरोधात ढोल पिटत होते, ते आता आघाडी सरकारमध्ये आहेत. तरीही पूरग्रस्त कुटुंबांना मदत मिळत नाही. अशा लोकप्रतिनिधींना जनता जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. ताबडतोब मदत करा, अन्यथा किंमत मोजावी लागेल.
सकाळी अकरा वाजता मोर्चा सुरू झाला. भाजप जनसंपर्क कार्यालय ते तहसील कार्यालयापर्यंतचा परिसर आंदोलनाचाच माहोल दिसत होता. भाजपचे झेंडे घेऊन दुचाकीवरून फिरणारे तरुण घोषणा देत होते. ‘आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा’ ही प्रमुख घोषणा होती. पूरग्रस्त विद्यार्थ्यांची फी माफी झाली पाहिजे, या मागणीचेही फलक घेऊन ते घोषणा देत होते. मोर्चामध्ये तरुणांचा सहभाग लक्षणीय दिसला.
140921\1952-img-20210914-wa0011.jpg
मोर्चा