पलूस : इंधन दरवाढ, घरगुती गॅस दरवाढीचा निषेध व केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात तहसीलदार निवास ढाने यांना पलूस तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसने निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, या कृषी कायद्यांमुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे. हा काळा कायदा रद्द करण्यासाठी ५०० हून अधिक शेतकरी बांधवांचा यामध्ये बळी गेला आहे. तरीही मोदी सरकारला शेतकऱ्यांच्या भावना समजत नाहीत.
भाजप सरकारने फायद्यात असलेल्या सार्वजनिक कंपन्या, सरकारी उद्योगांची विक्री करण्याचा घाट घातला आहे. सातत्याने पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसचे दर वाढत आहेत. यामुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे अवघड झाले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्षा पूजा लाड, तालुकाध्यक्षा नंदाताई पाटील, जिल्हा उपाध्यक्षा मृणाल पाटील, पूनम जाधव, मंगल शितापे, सारिका पाटील, सुनंदा पाटील, पूजा पवार, सविता पाटील, पुष्पा पाटील आदींसह महिला उपस्थित होत्या.