भिलवडी : महापुराच्या पाण्याने भिलवडी (ता. पलूस) येथील सार्वजनिक वाचनालय या संस्थेचे रंगकाम पूर्णपणे खराब झाले होते. वाचनालयाच्या आर्थिक अडचणीमुळे हे रंगकाम करणे वाचनालयास अशक्य होते. वाचनालयाची अडचण ओळखून वाचनालयाचे अध्यक्ष व उद्योजक गिरीश चितळे यांनी साठ हजार रुपये खर्चून हे रंगकाम पूर्ण केले.
विश्वस्त जी. जी. पाटील व ज्येष्ठ संचालक भू. ना. मगदूम यांच्या हस्ते आर्थिक योगदानाबद्दल चितळे यांचा ग्रंथ भेट व गुलाबपुष्प देऊन कृतज्ञतापर सत्कार करण्यात आला. वाचनालयाचे कार्यवाह सुभाष कवडे यांनी सर्वांचे स्वागत करून रंगकाम पूर्ण केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. गिरीश चितळे म्हणाले की, काकासाहेब चितळे यांच्याप्रमाणे वाचनालयास सर्वतोपरी सहकार्य करू. वाचनालयाच्या प्रगतीसाठी व वाचन चळवळीसाठी सारे मिळून प्रयत्नशील राहू.
यावेळी डी. आर. कदम, आर. डी. चोपडे, आरती पाटील, भू. ना. मगदूम, गिरीश चितळे यांनी वाचनकट्टा उपक्रमानिमित्ताने वाचलेल्या पुस्तकांचा व दिवाळी अंकाचा परिचय करून दिला.
याप्रसंगी उद्योजक मकरंद चितळे व भक्ती चितळे यांनी वाचनालयास अध्यात्मिक व संस्कारक्षम अशी पंचवीस पुस्तके भेट दिली. डी. आर. कदम यांनी आभार मानले. याप्रसंगी वाचनालयाचे संचालक व वाचनप्रेमी ग्रामस्थ व वाचनालयाचे सर्व सेवक उपस्थित होते.
फोटो : ०३ भिलवडी १
ओळ : भिलवडी (ता. पलूस) येथे उद्योजक गिरीश चितळे यांचा जी. जी. पाटील, सुभाष कवडे, डी. आर. कदम, भू. ना. मगदूम यांनी सत्कार केला.